आठवडा विशेष | ज्ञानेश्वर धोंडू पाटील
सोयगाव दि.१०:शहरातील विविध खासगी मोबाईल कंपन्यांकडे वार्षिक मालमत्ता करापोटी वारेमाप थकबाकी झाल्याने सोयगाव नगर पंचायतीने तब्बल तीन कंपन्यांच्या मोबाईल मनोऱ्याला गुरुवारी दुपारी सील ठोकल्याने दोन दिवसापासून सोयगावात मोबाईल सेवा ठप्प झाल्याने सोयगाव विना मोबाईल शहर झाले असल्याने मोठा गोंधळ उडाला आहे.
शहरात नगर पंचायतीच्या हद्दीत विविध मोबाईल कंपन्यांचे मोबाईल मनोरे आहे,परंतु या खासगी कंपन्यांकडे मालमत्ता करापोटी मोठी थकबाकी झाल्याने वारंवार पूर्वसूचना देवूनही त्यांनी थकबाकीची रक्कम न भरल्याने गुरुवारी दुपारपासून नगर पंचायतीच्या पथकाने धडक मोहीम हाती घेवून संबंधित कंपन्यांच्या मोबाईल मनोऱ्याला सील ठोकल्याने सेवा विस्कळीत झाल्या असल्याने शहरातील मोबाईलचा खणख नाट बंद झाला आहे.
ऐन दुष्काळात शासकीय अधिकाऱ्यांची धांदल-
ऐन दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहून मोबाईल यंत्रणा सुरूच ठेवण्याच्या सक्तीच्या सूचना असतांना शहरातील मोबाईल सेवा विस्कळीत झाल्याने अनेक दिवसापासून धूळखात पडलेले दूरध्वनी संच शासकीय कार्यालयात बाहेर निघाल्याने या दूरध्वनी संचावरून अधिकारी व कर्मचारी दुष्काळाच्या उपाय योजनांचे अपडेट वरिष्ठांना देत असल्याचे शुक्रवारी दिसून आले.