ग्रामस्थांच्या जाणून घेतल्या व्यथा ; गरज असलेल्या ठिकाणी टँकर तसेच पाणी योजनांना गती देण्याच्या प्रशासनाला केल्या सूचनाल
परळी/अंबाजोगाई दि.११: आठवडा विशेष टीम― राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी दुष्काळी दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आज परळी तालुक्यातील तीव्र पाणी टंचाई असलेल्या गावांना भेटी देऊन ग्रामस्थांच्या व्यथा जाणून घेतल्या. गरज असेल त्या ठिकाणी तातडीने पाण्याचे टॅकर देण्याच्या तसेच ज्या गावांमध्ये मुख्यमंत्री पेयजल अथवा राष्ट्रीय पेयजल योजना सुरू आहेत, तेथील योजनांची कामे जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला केल्या.
पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे हया कालपासून बीड जिल्हयात दुष्काळी दौ-यावर आहेत. काल पाटोदा, शिरूर, बीड, केज, अंबाजोगाई आदी तालुक्यांना त्यांनी भेटी दिल्या. चारा छावणी भेट, शेतक-यांशी संवाद, वाॅटरकप स्पर्धेतील गावांत श्रमदान केले. या दौ-यातंर्गत आज त्यांनी परळी तालुक्यातील धारावती तांडा, रेवली तांडा, गोवर्धन, वाका, सिरसाळा आदी तीव्र पाणी टंचाई असलेल्या गावांना भेटी देऊन ग्रामस्थांच्या व्यथा जाणून घेतल्या. ग्रामस्थांनी विशेषतः महिलांनी पाण्याच्या अडचणी विषयी सांगितल्यानंतर तातडीने टॅकर देण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला केल्या. तालुक्यात मुख्यमंत्री पेयजल आणि राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेची कामे गतीने पुर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी उपस्थित अधिका-यांना केल्या. एवढा महिना आपल्याला सहन करावा लागणार आहे, परंतु बीड जिल्हयाला दुष्काळातून कायमस्वरूपी बाहेर काढण्यासाठी वाॅटरग्रीड प्रकल्प आणि कृष्णा खो-याचे पाणी मिळण्यासाठी ३२ कोटीची योजना आखली आहे, पुढील सात वर्षात संपूर्ण जिल्हयाचा पाणी प्रश्न सुटेल असे त्या यावेळी म्हणाल्या. भाजपचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव गुट्टे, श्रीहरी मुंडे, गयाताई कराड, राजेश गिते, नितीन ढाकणे, काशीनाथ राठोड, विजय राठोड, पप्पू चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते.
टंचाईग्रस्त दैठण्याला भेट
दुष्काळ पाहणी दौऱ्याचा कालचा समारोप मध्यरात्री १२ वा अंबाजोगाई तालुक्यातील दैठणा या गावी झाला. अंबाजोगाई तालुक्यातील टंचाईग्रस्त दैठणा या गावाला भेट देऊन ना.पंकजाताई मुंडे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.दैठणा गावच्या टँकरचा प्रस्ताव लवकरच मंजूर होईल व गावकऱ्यांना पिण्याचे पाणी मिळेल. जिल्हयाचा दुष्काळ कायमचा हटविण्यासाठी शासन स्तरावर आपण उपाययोजना करत असल्याचे त्या म्हणाल्या. याप्रसंगी गावकऱ्यांच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन गावच्या सरपंचांनी त्यांना दिले. आ. संगीता ठोंबरे, रमेश आडसकर, भाजपचे तालुकाध्यक्ष नेताजी देशमुख, अच्यूत गंगणे, विलास जगताप आदी यावेळी उपस्थित होते.