अंबाजोगाई (प्रतिनिधी): अंबाजोगाईचे सुपुत्र सुमेध दासु चव्हाण यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत कर सहाय्यक (टॅक्स असिस्टंट) या पदासाठी 2 डिसेंबर 2018 रोजी परिक्षा दिली होती. मुख्य परिक्षेत चव्हाण हे महाराष्ट्र राज्यातून एस.सी.प्रवर्गात प्रथम आले आहेत.सदर परिक्षेचा निकाल सोमवार रोजी जाहिर झाला असून यशस्वी विद्यार्थ्यांची नांवे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नुकतेच जाहिर करण्यात आले आहेत.सुमेध चव्हाण यांच्या स्पृःहनिय कामगिरीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
सुमेध चव्हाण यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हे गुरूदेव विद्यालय मोरेवाडी येथे झाले.तसेच त्यांनी इयत्ता 11 वी व 12 वी आणि बी.एस.सी.चे शिक्षण योगेश्वरी महाविद्यालयातून घेतले. सुमेध यांचे वडील दासु चव्हाण हे कृषी खात्यात सुपरवायझर या पदावर कार्यरत होते.तर त्यांची आई गृहीणी असून त्यांचा एक भाऊ जिल्हा परिषद शिक्षक आहे. त्यांना एक बहिण आहे. बी.एस.सी.पुर्ण झाल्यानंतर सुमेध यांनी औरंगाबाद येथील रिलायबल स्पर्धा परिक्षा केंद्रातून धनंजय आकात यांचे मार्गदर्शन घेतले व कर सहाय्यक पदाच्या परिक्षेची पुर्व तयारी केली.दि.2 डिसेंबर 2018 रोजी त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या कर सहाय्यक पदाची परिक्षा दिली. सदर परिक्षेचा निकाल सोमवार,दि.6 मे रोजी लोकसेवा आयोगाने वेबसाईटवर जाहिर केला.त्यात सुमेध दासू चव्हाण हे कर सहाय्यक म्हणुन मागासवर्गीय प्रवर्गात राज्यातून प्रथम आले आहेत.त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे अंबाजोगाई येथील भाजपा युवा मोर्चा बीड जिल्हाउपाध्यक्ष उज्जैन बनसोडे यांनी सुमेध दासु चव्हाण यांचा पुष्पगुच्छ व शाल देवून गुरूवारी सत्कार केला. या प्रसंगी बाळासाहेब पवार,कल्याण देशमुख, गणेश सोनवणे,आक्षय सिरसट,अतुल मुळे व स्वप्नील चव्हाण आदींची उपस्थिती होती.
अभ्यासात सातत्य, प्रामाणिकपणा व संयम ठेवल्यास हमखास यश-सुमेध चव्हाण
स्पर्धा परिक्षेची तयारी करताना अभ्यासात सातत्य ठेवा,स्वतःशी प्रामाणिक रहा आणि संयम ठेवला पाहिजे तर हमखास यश मिळविता येते.आपण दररोज दहा तास अभ्यास केला. परिक्षेची संपुर्ण तयारी केली व हे यश आई-वडील,बहिण,भाऊ, गुरूजण आणि मित्र परिवाराच्या प्रोत्साहनामुळे मिळवू शकलो.