आष्टी :सुमो जीप आणि कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात कारमधील बाळासाहेब दादाराव देवगडे (वय ४५) हे जागीच ठार झाले तर दोन्ही वाहनातील एकूण ८ जण जखमी झाले. हा अपघात आज पहाटे ५ वाजता आष्टी पोलीस ठाण्यापासून अवघ्या एक किमी अंतरावर झाला.अपघातग्रस्त पोलीस-जीप ही आष्टी पोलिसांची असल्याची माहिती समोर येत आहे.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील लहुरी गावातील देवगडे हे सध्या डोंबिवली येथे राहतात. सोमवारी रात्री डोंबिवलीवरून ते आपल्या मूळ गावी लहूरी येथे जाण्यासाठी नातेवाईकांसोबत कारने (एमएच ०१ बीके ९२४९) निघाले होते. आज पहाटे ते आष्टी पोलीस ठाण्यापासून अवघ्या एक किमी अंतरावर आले असता पोलीस जीप (एमएच २३ एफ १११७) आणि त्यांच्या कारची समोरासमोर धडक झाली. यात अपघातात कारमधील बाळासाहेब दादाराव देवगडे हे जागीच ठार झाले. तर, किशोर बाळासाहेब देवगडे (वय २३), वसंत डांगे (वय २५, रा कोल्हेवाडी ता केज ), सुमन वसंत डांगे (वय २३, रा. कोल्हेवाडी, ता. केज), सोनाली देवगडे (वय २०, रा. लाहूरी ता. केज) यांच्यासह आर्यन आणि आराध्या ही दोन चिमुकली जखमी झाली. त्यांच्यावर नगर येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
तसेच पोलीस जीपमधील चालक हनुमंत बांगर, विठ्ठल नरवडे हे दोघे जखमी असून त्यांच्यावर आष्टी येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनास्थळी उपस्थित असलेले पोलिस उपनिरीक्षक डॉ. विशाल शहाने, पोह गणेश भोसले, पोका सचिन कोळेकर, पोह नवनाथ काळे, पोना पाडूरग दराडे, पोका अनिल राऊत यांनी तात्काळ जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असल्याची माहिती समोर येत आहे.