पाटोदा(चांगदेव गिते): भारत स्वतंत्र झाल्यापासून पाटोदा तालुक्याला फक्त अडीच तीन वर्षे आमदारकी मिळाली. कारण आष्टी मतदारसंघात आष्टीसह पाटोदा अन शिरूर असे तीन तालुके येतात. या मतदार संघातून विधिमंडळात जायची संधी जास्त करून आष्टी तालुक्यातील नेत्यांना मिळाली. पाटोदाच्या वाटेला फक्त १९७८ च्यावेळी जवळपास अडीच तीन वर्षे स्वर्गीय लक्ष्मण मामा जाधव यांच्या रूपाने आमदारकी पहायला मिळाली. त्यानंतर मतदार संघाची धुरा प्रामुख्याने आष्टी करांकडेच कायम राहिली. सध्याही आष्टी तालुक्यात दोन, आमदार व एक जिल्हा परिषद अध्यक्ष, माजी अध्यक्ष, माजी आमदार असा मोठा फौज-फाटा आहे. मात्र यावेळी सुरेश धस हे विधानपरिषदेवर असल्याने, तालुक्याचा वाद वाढला तर आमदारकीची माळ गर्जे यांच्या गळ्यात पडु शकते, शिवाय चालु आमदार भीमराव धोंडे यांचं वाढतं वय अन इतर बाबीचा विचार केल्यास गर्जे विजयी ही होऊ शकतात. गर्जे हे राष्ट्रवादी पक्षाचे निष्ठावंत असल्याने त्यांना तिकीट मिळवताना जास्त अडचणी येणार नाहीत. जर अशी गणितं जुळली तर महेंद्र गर्जे यांच्या रूपाने पाटोदेकरांना चाळीस वर्षानंतर तालुक्यातील आमदार पहायला मिळू शकतो.