मुंबई दि.१५: आठवडा विशेष टीम― मोहने कल्याण येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती.या प्रकरणी वार्ड अधिकारी सुधीर मोकळ हे दोषी असल्यामुळे त्यांना सेवेतून निलंबित करून त्यांचेवर अट्रोसिटी आणि इतर कलमाखाली गुन्हा नोंदवून अटक करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सचिव दयाल बहादूरे यांनी कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त गोविंद बोडके आणि अप्पर पोलीस आयुक्त प्रताप दिघावकर यांची भेट घेऊन निवेदन दिले.
मोहने येथे दि.०७ मे रोजी मिलिंद जाधव यांच्या दुकानाच्या जुन्या बांधकामावर कारवाई करताना दुकानात असलेल्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची अवहेलना करून गैरप्रकारे पुतळा जप्त केला.आणि त्याची विटंबना केली असता या प्रकरणाच्या निषेधार्थ रिपब्लिकन पक्षाच्या वतीने दि.०९ मे रोजी मोहने शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला होता.
वार्ड अधिकारी सुधीर मोकळ यांनी बांधकाम तोडताना चुकीच्या पद्धतीने कारवाई केल्यामुळे जनतेमध्ये संताप व्यक्त होत असून सदर प्रकरणात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लक्ष घातले आहे.ठाणे पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्त यांच्याशी त्यांनी बोलून
वार्ड अधिकारी मोकळ व सुनील जोशी मुख्य अभियंता अनधिकृत बांधकाम यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.अशी माहिती दयाल बहादूरे यांनी दिली आहे.
सुधीर मोकळ आणि सुनील जोशी यांचेवर प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास प्रचंड मोठा मोर्चा काढण्याचा इशारा दयाल बहादुरे यांनी दिला आहे.तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीसुद्धा रिपब्लिकन पक्षाचे शिष्टमंडळ भेट घेणार असून कारवाई करण्याची मागणी करणार आहे.