तारकेश्वरगडावर आयोजित नारायण महाराज पुण्यतिथी सोहळ्यास भक्तांची मांदियाळी
शिरूर दि.१६: श्री क्षेत्र तारकेश्वर गडावरील विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब उपमुख्यमंत्री असताना झाली होती.आज गडावर आल्या नंतर मुंडे साहेबांची प्रकर्षाने आठवण येते आहे. गडाचे आशीर्वाद आणि दर्शन घेण्याची प्रथा मुंडे साहेबांनी सुरु केली या परंपरेची पाईक असल्याने तारकेश्वर गडावर येऊन दर्शन आणि आशीर्वाद घेण्याचे भाग्य मला लाभल्याचे खा.डॉ.प्रितमताई मुंडे म्हणाल्या.
श्री क्षेत्र तारकेश्वर गड येथे संत नारायण महाराज यांच्या आठव्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते . याप्रसंगी उपस्थित भाविकांशी खा.डॉ.प्रितमताई मुंडे बोलत होत्या. कार्यक्रमाला मठाधिपती आदिनाथ महाराज शास्त्री , आष्टी मतदारसंघाचे आमदार भीमराव धोंडे , विजय गोल्हार , जि.प.सदस्य रामदास बडे यांच्या सह विविध मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित भाविकांशी बोलताना खा.डॉ.प्रितमताई मुंडे म्हणाल्या ‛ संत नारायण महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त आज गडावर आल्या नंतर मुंडे साहेबांनी प्राण प्रतिष्ठा केलेल्या विठ्ठल रुख्मिणीचे आशीर्वाद घेतल्या नंतर मिळालेली प्रेरणा शब्दात व्यक्त न होणारी आहे. तारकेश्वर गडावर आल्या नंतर तारकेश्वर गडात झालेला बदल जसा मला दिसतोय तसाच प्रत्येक भक्तगणाला जाणवत असेल. तारकेश्वर गडावर येणाऱ्या भाविकांशी गैरसोय होऊ नये म्हणून पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्या प्रयत्नांतून आष्टी ते महिंदा या पन्नास कि. मी मार्गाचे डांबरीकरण सुरु आहे.
चार वर्षाच्या काळात जिल्ह्यातील सर्व गडांसह छोट्यामोठ्या गावांना विकासाचा स्पर्श देण्याचे काम आम्ही सर्वांच्या आशीर्वादाने केले आहे याचा आनंद आहेच परंतु यापूढेही मुंडे साहेबांचा जनसेवेचा वसा आणि वारसा सर्वांना सोबत घेऊन चालवत राहू असे खा.डॉ.प्रितमताई मुंडे म्हणाल्या.
सध्या राज्यासह जिल्हात असलेल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी भरपूर प्रमाणात पाऊस पडू दे अशी प्रार्थना यावेळी खा.प्रितमताईंनी संत नारायण महाराजांच्या चरणी केली.याप्रसंगी संत नारायण महाराज पुण्यतिथी निमित्त ह.भ.प.महादेव महाराज राऊत यांचे सुश्राव्य कीर्तन आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाला संत नारायण महाराज यांच्या राज्यभरातील भक्तगणांसह पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.