आठवडा विशेष | ज्ञानेश्वर धोंडू पाटील
सोयगाव दि.१६: सोयगाव तालुक्याची दुष्काळाची दाहकता लक्षात घेता,मजुरांच्या हातांना काम उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याने ग्रामसेवकांनी नवीन कामांचे नियोजन तयार करून जास्तीत जास्त मजुरांना कामे मिळतील असा आशावाद बाळगावा अशा सूचना शांता सुलेवाड यांनी गुरुवारी सोयगावला दिल्या आहे.दुष्काळात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
तालुक्यात ४७ ग्रामपंचायतींनी रोजगार हमी योजनेच्या कामांना प्राधान्यक्रम देवून यामध्ये गाळ काढणे,विहीर खोलीकरण,आदि कामेही प्रस्तावित करावी व त्याचसोबत मागील अपूर्ण कामेही तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना केल्या आहे.बैठकीसाठी तालुक्यातील ग्रामसेवक,रोजगार हमी योजनेचे नितीन भवरे आदि कर्मचारी आदींची उपस्थिती होती.
सिंचन विहिरींची संदिग्धता-
दरम्यान दुष्काळाची चाहूल लागताच जिल्हा प्रशासनाच्या वतीने फेब्रुवारी महिन्यातच रोजगार हमी योजनेच्या कामातून प्रत्येक ग्रामपंचायतीला पाच सिंचन विहिरींचे उद्दिष्ट्य दिले होते परंतु या उद्दिष्ठातून एकही विहिरीचे काम पूर्ण झाले नसल्याने सोयगाव तालुक्यातून एकही ग्रामपंचायतींचे विहिरींचे प्रस्ताव आले नसल्याचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी शांता सुलेवाड यांनी सांगितले असतांना प्रत्यक्षात मात्र साठ विहिरींचे प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयात धूळखात पडून असल्याने विद्यमान प्रभारी गटविकास अधिकारी यांना या प्रस्तावांकडे पाहण्यास वेळच मिळाला नसल्याचे उघड झाले आहे.