कृष्णा नदी पात्रात मगरीने १२ वर्षाच्या आकाशला नेले ओढून ; १२ तासानंतर मृतदेह हाती

सांगली :आठवडा विशेष टीम― डिग्रज ता. मिरज येथे कृष्णा नदीपात्रात पाण्यात पाय सोडून बसलेल्या एका १२ वर्षांच्या मुलाला मगरीने ओढून नेले होते.त्या १२ वर्षीय शाळकरी मुलाचा मृतदेह सापडला आहे. वन विभाग आणि जीवरक्षक टीम कालपासून नदीपात्रात आकाश जाधवचा शोध घेत होते. अखेर १२ तासांनी आकाशचा मृतदेह त्यांच्या हाती लागला आहे.

आकाश मारुती जाधव (वय १२) असे त्या मुलाचे नाव आहे. तो मुलगा विटभट्टीवर काम करणाऱ्या मजूर कुटुंबातील आहे. डिग्रज-ब्रह्मनाळ रस्त्यावर छोटा पाणवठा आहे. तेथे जवळच वीटभट्टी असून, तेथील कामगारांची मुले पाणवठ्यावर जातात. गुरुवारी दि.१६ आकाश आणि त्याच्या दोन बहिणी पाणवठ्यावर गेले होते. आकाश जाधव नदीच्या पाण्यात पाय सोडून खेळत होता. अचानक मगरीने त्याच्यावर हल्ला केला आणि त्यास नदीपात्रात ओढून नेले. ही घटना गुरुवारी दि.१६ मे रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
बराच वेळ मगर आकाश जाधवला जबड्यात धरून नदीपात्रात फिरत होती. ते दृश्य पाहून तेथील लोकांच्या अंगावर काटा आला. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नौकेतून मगरीचा पाठलाग केला. काही वेळ पाठलाग केल्यानंतर मगरीने आकाशला सोडले. मगरीने आकाशला सोडल्याचे पाहिल्यानंतर वन कर्मचाऱ्यांनी त्याचा त्या नदीपात्रात शोध घेतला परंतु तो सापडला नव्हता तेव्हापासून वन विभाग आणि जीवरक्षक टीम मुलाचा शोध घेत होती. अखेर १२ तासांनी त्याचा मृतदेह या टीमच्या हाती आला.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.