पालघर दि.१७: शिवाजी जन्माला यावा असे प्रत्येकालाच वाटत असते, मात्र तो शेजारच्याच्या घरात. पण शेजारच्याच्या घरात जन्माला आलेल्या शिवाजीला संभाळण्याचे आणि घडवण्याचे काम ज्या “जिजाऊ” संस्थेच्या माध्यमातून होत आहे, ते काम आभाळाएवढे मोठे आहे, असे प्रतिपादन ‘आयएएस’ श्री. हेमंता पाटील यांनी केले.
जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या वतीने विविध स्पर्धा परिक्षांमध्ये यश मिळवणाऱ्या गुणीजनांच्या सत्कार समारंभप्रसंगी आयोजित झड़पोली येथील कार्यक्रमात प्रमुख पाहुणे आणि सत्कारमुर्ती म्हणून ते बोलत होते. यावेळी जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे, अध्यक्ष नरेश आकरे, उद्योजक तुषार राऊळ, श्री. हेमंता पाटील यांचे आई – वडील आदी मान्यवर उपस्थित होते. “मी स्वत: 10 वीपर्यंत आश्रमशाळेत शिकलो. गरीबीचे चटके सहन केले आहेत. याच परिस्थितून आपल्याला जगण्याचे बळ मिळते. त्यामुळेच मी आयएएसपदाला गवसणी घालू शकलो. त्यामुळेच कष्टाच्या जगण्याचे भांडवल न करता त्याला आपली शक्ती बनवले पाहिजे”, असा संदेशही श्री. हेमंता पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिला. वाड्याचे सुपुत्र असणारे हेमंता पाटील यांनी UPSC मध्ये देशात 39 वे तर महाराष्ट्रातून 5 वे येत तरुणाईसाठी नवा आदर्श घालून दिला आहे.
यावेळी बोलताना जिजाऊ संस्थेचे संस्थापक श्री. निलेश सांबरे यांनी, “गरीबीमुळे कुठल्याच विद्यार्थ्यांना आम्ही मागे राहू देणार नाही. ज्या ज्या वेळी त्यांना गरज लागेल तिथे जिजाऊ संस्था त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिल. कारण कोकणातील गावा – गावातून आपल्याला अधिकारी घडवायचे आहेत त्याची प्रक्रिया आता सुरु झालेली आहेत आणि हेमंता पाटील यांच्या प्रेरणेने तो मार्ग आता अधिक सूखकर होईल”, अशी ग्वाही दिली. या गौरव समारंभात हेमंता पाटील आणि मान्यवरांच्या हस्ते जिजाऊ संस्थेच्या मार्गदर्शनाखाली विविध वाचनालयात यश मिळवलेल्या ललित मौले (एसटीआय), कुणाल पाटील (अभियांत्रिकी सेवा), अनिकेत सांगड़े, झंकार भोईर, अरविंद वड ( एमपीएससी), सतिश पाटील (मुंबई महापालिका), महेश पाटील, अनिल बांगर, गणेश दवणे ( ठाणे – मुंबई कोर्ट क्लर्क), विशाल महाले (आयआयटी मुंबई), अरविंद देशमुख, राहुल सवर (कबड्डी महाराष्ट्र टीम निवड), ज्ञानेश्वर मोरघा, कविता भोईर, दिनेश म्हात्रे (राज्यस्तरिय धावपटू), सुधीर भोईर (सेट परीक्षा पास), विवेक वेखंडे (पोलिस) अशा विविध क्षेत्रात उज्ज्वल यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थांचा यथोचित सत्कार करण्यात आला.