ना.पंकजाताई मुंडे यांनी केलेल्या जनजागृतीचे फलित !
बीड दि.१७: राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून केलेल्या जनजागृती मुळे बीड जिल्हयात मुलींचा जन्मदर वाढला असून एक हजार मुलांमागे ९६१ मुली एवढा उच्चांक जन्मदरात झाला आहे. दरम्यान, ही बाब जिल्हयाच्या दृष्टीने अभिनंदन व गौरवाची आहे अशा शब्दांत ना. पंकजाताई मुंडे यांनी याचे स्वागत केले आहे.
राज्य व केंद्र सरकारने मुलींच्या सर्वांगिण विकासासाठी अनेक योजना यशस्वीपणे अमलात आणल्या आहेत. ना. पंकजाताई मुंडे यांनी मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू केली, त्याच प्रमाणे बेटी बचाव बेटी पढाव ही योजना देखील यशस्वी केली. स्त्री भ्रुण हत्या विषयी कायद्यात कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली, मुलींना शिक्षणाच्या अधिक सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या याशिवाय मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी शासकीय व स्थानिक स्तरावर मोठ्या प्रमाणात जनजागृती केल्याचा परिणाम म्हणून जिल्हयात हा जन्मदर वाढला आहे. पुर्वी मुलींचा जन्मदर हजार मुलांमागे ७६९ इतका खालावला होता परंतु आता ना. पंकजाताई मुंडे यांनी महिला बालविकास मंत्री म्हणून आखलेल्या योजनांची चांगल्या प्रकारे अंमलबजावणी झाल्याने हा जन्मदर ९६१ इतका झाला आहे.
जिल्हयाचा गौरव – ना. पंकजाताई मुंडे
एकेकाळी बीड जिल्हा स्त्री भ्रुण हत्यांमुळे कलंकित झाला होता, परंतु आता हा कलंक पुसला गेला असून मुलींचा जन्मदर ९६१ इतका झाला आहे, ही निश्चितच अभिनंदनीय व गौरवाची बाब आहे. जिल्हयाची आरोग्य यंत्रणा व सर्व संबंधित अधिकारी व कर्मचा-यांनी अतिशय मेहनत घेऊन शासनाच्या योजनांची अंमलबजावणी व जनजागृती केल्यामुळे हे शक्य झाले अशा शब्दांत पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी सर्वांचे कौतुक केले.