सोयगाव,दि.१३:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
सोयगाव तालुक्यातील विविध भागात अडकलेल्या १६ परप्रांतीय मजुरांना बुधवारी दुपारी तहसील कार्यालयातून विशेष बसने मोफत राज्याच्या सीमेपर्यंत पाठविण्यात आले आहे.महसूल आणि परिवहन यांच्या संयुक्त मदतीने या परराज्यातील मजुरांना मध्यप्रदेशच्या सीमेजवळील इच्छापूर पर्यंत सोडण्यात आले आहे.पहिल्या यादीतील परराज्यातील १६ मजुरांना तहसीलदार यांनी त्यांच्या राज्यात जाण्यासाठी निरोप दिला.
कोरोना विषाणूच्या लॉकडाऊनमध्ये तब्बल ४५ दिवसापासून परराज्यातील १६ मजूर तालुक्याच्या विविध भागात अडकले होते,जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तहसीलदार पांडे यांनी तातडीने तलाठ्यांना कामाला लावून अडकलेल्या मजुरांच्या याद्या मागवून या मजुरांची कोरोना तपासणी करून त्यांना बुधवारी तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारातून निरोप देण्यात आला.यावेळी या मजुरांच्या चेहऱ्यावर मात्र आनंदाचे अश्रू दिसत होते,मध्यप्रदेशातील संबंधित नोडल अधिकारी या मजुरांना राज्याच्या सीमेवरून ताब्यात घेणार आहे अशी माहिती तहसीलदार प्रवीण पांडे यांनी दिली.यावेळी आगार प्रमुख हिरालाल ठाकरे,ए.डी पायघन,नायब तहसीलदार मकसूद शेख,सुधीर जहागीरदार,शिपाई अनिल पवार,शिवाजी शेरे,ग्रामीण पत्रकार संघटनेचे अध्यक्ष दिलीप शिंदे आदींनी या मजुरांना निरोप दिला.
बस मध्ये प्रवास करतांना या मजुरांना तहसील कार्यालयाच्या वतीने अध्यक्ष दिलीप शिंदे यांच्या हस्ते मास्क वितरण करण्यात आले.सोयगाव आगाराच्या वतीने बसचे निर्जंतुकीकरण करण्यात आले होते.