मुंबई दि.२१ : आठवडा विशेष टीम― भिवंडी तालुक्यातील सुप्रसिद्ध देवस्थान असलेल्या वज्रेश्वरी मंदिरात मागील आठवड्यात दरोडा पडला होता. यावेळी दानपेटीतील सुमारे ८ ते १० लाख रुपये लांबवल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. या गुन्ह्याचा तपास ठाणे ग्रामीणची स्थानिक गुन्हे शाखा करत होती. अवघ्या आठवड्याभरातच पोलिसानी आपले तपास कौशल्य वापरून या दरोड्याची उकल केली. सर्व आरोपी आणि दरोड्यातील रक्कम हस्तगत करण्यात यश मिळविले आहे. या यशस्वी कामगिरी बद्दल पोलिसांचे विशेषतः स्थानिक गुन्हे शाखा (एल.सी.बी) टीम चे सर्वत्र कौतुक होत आहे.
वज्रेश्वरी येथील मंदिरात पहाटेच्या वेळी ५ दरोडेखोरांनी तोंडाला कापड बांधून प्रवेश केला आणि येथील सुरक्षा राक्षकाला मारहाण करून त्याला बांधून ठेऊन देवीच्या दानपेटीतील सर्व रक्कम लंपास केली होती. दरोडेखोरांनी आपला चेहरा लपवला होता, आणि तसे तपासाचे धागेदोरे हाती लागणे अवघड होते, त्यात जनतेतून तपास लवकर व्हावा म्हणून दबाव वाढत होता, पोलीस अपयशी ठरतात असा आरोप करत काही नेत्यांनी हा तपास सीआयडी कडे द्यावा अशीही मागणी केलेली, या सर्व दबावात जराही विचलित न होता एलसीबी ची स्पेशल टीम आणि गणेशपुरी पोलीस ठाण्याचे एक पोलीस उपनिरीक्षक आणि काही कर्मचारी अशी पूर्ण टीम दिवस रात्र काम करत होती. मोबाईल सिडीआर, सीसीटीव्ही फुटेज हे केवळ दोन माध्यम होते, अशा परिस्थितीत सतत काम करत या टीमने आरोपींचा सुगावा लावला, टीम मध्ये असलेले सस्थानिक कर्मचारी आपल्या अनुभवाचा कस लावत होते, एलसीबी चे सह पोलीस निरीक्षक बडाख हे सतत आपल्या टीम ला ऍक्टिव्ह ठेवत काम करत होते, आशा सतत च्या परिश्रमानंतर आरोपी हे फासेपारधी किंवा परप्रांतीय नसून स्थानिक आहेत हे आधी निष्पन्न झाले. मग त्यांची लोकेशन ट्रॅक करणे सुरू झाले, शहापूर, वाडा,जव्हार ते दिव दमन असा पाठलाग सुरू झाला, आणि अखेर या दरोडेखोरांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले.
आरोपींच्या अटकेनंतर लगेचच त्यांच्याकडे असलेली दरोड्यात लांबवलेली रक्कम रुपये २ लाख ८३ हजार पोलिसांनी हस्तगत केले. यात आरोपी गोविंद सोमा गिम्भल (दाभलोन, ता.जव्हार) , विनित सुरजी चिमडा, भारत लक्ष्मण वाघ, जगदीश काशीनाथ नावतरे, प्रवीण काशिनाथ नावतरे (सर्व रा.गरेल पाडा,अघई, ता.शहापूर) हे आरोपी अटकेत आहेत.
पोलीस अधीक्षक, डॉ.शिवाजी राठोड, अति. पोलीस अधीक्षक संजय पाटील, एलसीबी पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली या तपास कामी दिवस रात्र काम केलेले पोलीस अधिकारी सहा पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख,पोलीस उपनिरीक्षक विशाल वायकर, अभिजित टेलर, स.फौ.अनिल वेढे, पो हवा.अर्जुन जाधव, पो.ना.अशोक पाटील,संजय शिंदे, पुष्पेन्द्र थापा,प्रदीप टक्के, हनुमंत गायकर, दीपक गायकवाड, मनोज चव्हाण, पोलीस शिपाई सतीश जगताप ,राजेश श्रीवास्तव ,गणेश सिरसाट, भगीरथ मुंडे या पथकाने अत्यंत परिश्रम घेऊन या गुन्ह्याची उकल केली.