सोयगाव दि.११(ज्ञानेश्वर धोंडू पाटील):सोयगाव तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची धुरा सांभाळणाऱ्या सोयगाव ग्रामीण रुग्णालयाला दोन महिन्यापासून वैद्यकीय अधिकारीच नसल्याने ऐन दुष्काळात नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.दरम्यान तातडीने नियुक्त केलेल्या दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केवळ ग्रामीण रुग्णालयाची पाहणी करून रुजू झाल्यानंतर अद्यापही हजर न झाल्याने गुरुवारी या दोन्ही नवीन गैरहजर वैद्यकीय अधिकार्यांचा अहवाल आरोग्य उपसंचालक औरंगाबाद यांना पाठविण्यात आला आहे.
सोयगाव ग्रामीण रुग्णालयाचे तत्कालीन दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तडकाफडकी राजीनामे दिल्याने दोन महिन्यापासून सोयगावला आरोग्याची धुरा सांभाळण्याचे काम प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ शंकर कसबे यांचेवर आहे,परंतु वाढत्या उन्हाच्या झळांनी व बदलत्या वातावरणाने रुग्णांची वाढती संख्या झाल्याने आरोग्य उपसंचालक डॉ स्वप्नील लाळे यांचे आदेशावरून बंधपत्रीत वैद्यकीय अधिकारी डॉ.सिमरनजीत सिंग यांना व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ,सुंदर कुलकर्णी यांनी दिलेल्या आदेशावरून वैद्यकीय अधिकारी डॉ,अश्विनी बनसोडे या दोघांना सोयगावला नियुक्त करण्यात आले असता एप्रिल महिन्यात दि.५ रोजी हजर झालेल्या या दोघांनीही काढता पाय घेवून अद्यापही गैरहजर असल्याने सोयगाव ग्रामीण रुग्णालय अद्याप वैद्यकीय अधिकाऱ्याविना आहे.ऐन दुष्काळात सोयगाव ग्रामीण रुग्णालयाला वैद्यकीय अधिकारीच नसल्याने ग्रामीण भागातील रुग्णांची मोठी कोंडी झाली आहे.दरम्यान प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ.शंकर कसबे यांना कार्यालयीन कारभार सांभाळून रुग्णसेवा देण्याचे काम करता येत नाही.
0