ब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्यराजकारणशेतीविषयक

सोयाबीन उत्पादकांना पिक विमा नुकसान भरपाईची रक्कम तात्काळ वाटप करा―धनंजय मुंडे

मुंबई, दि.२१: शासनाच्या विशेषतः कृषी विभागाच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे सोयाबीन उत्पादक शेतक-यांना अद्याप पिक विमा नुकसान भरपाई मिळालेली नाही. बीड जिल्ह्यातील सुमारे बारा लाख शेतकरी पिक विमा नुकसान भरपाईच्या प्रतिक्षेत आहे. उन्हाळी मशागतीची कामे करण्यासाठी शेतक-यांना पैशांची आवश्यकता असून पात्र विमा धारक शेतक-यांना तात्काळ पिक विमा नुकसान भरपाईची रक्कम वाटप करा अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षेनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

या बाबत त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री, कृषी संचालक, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी यांच्यासह आदींकडे याबाबत त्यांनी लेखी मागणी केली आहे.

सोयाबीन उत्पादक शेतक-यांना पिक विमा नुकसान भरपाईची रक्कम तात्काळ वाटप करण्यासाठी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पुढाकार घेतला आहे.

खरीप २०१८ च्या हंगामाकरीता बीड जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतक-यांना विमा कंपनीकडे हप्त्याची रक्कम भरणा केलेली आहे. सोयाबीन व्यतिरिक्त इतर पिकांचा विमा बँकेकडे वर्ग झालेला आहे. मात्र शासनाच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे सोयाबीन उत्पादक शेतकर्यांना अद्याप पिक विमा नुकसान भरपाईची रक्कम मिळालेली नाही.

बीड जिल्ह्यात सुमारे बारा लाख शेतकर्यांनी सोयाबीनसाठी विमा हप्ता भरला होता. या पात्र विमा धारक शेतक-यांना सुमारे ८०० ते ९०० कोटी रुपये पिक नुकसान भरपाई मिळणे आवश्यक आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकर्यांची संपुर्ण पिके वाया गेलेली असतानाही शासन आणि संबंधित विभागाचे मंत्री या बाबत बोलत नाहीत. पिक विमा कंपन्यांकडून सातत्याने नफेखोरी केली जात असल्याची टिकाही वेळोवेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलेली आहे

पेरणीपूर्वी उन्हाळी मशागत करण्यासाठी शेतकर्यांकडे पैसा नाही, शेतक-यांना सध्या पैशांची नितांत आवश्यकता आहे. शासनाने केवळ कागदावर दुष्काळ जाहिर करून शेतकर्यांना कोणतीही आर्थिक मदत केलेली नाही. अशा परिस्थितीत किमान ज्या शेतक-यांनी विम्याचा हप्ता भरला आहे अशा पात्र शेतक-यांना पिक विमा नुकसान भरपाईची रक्कम वेळेत मिळाली पाहिजे अशी आग्रही भुमिका धनंजय मुंडे यांनी घेतली आहे.

पुढील सात दिवसांत सोयाबीन उत्पादक शेतकर्यांना तात्काळ पिक विमा नुकसान भरपाईची रक्कम वाटप करा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते शेतकर्यांसमवेत रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशाराही धनंजय मुंडे यांनी दिला आहे.

सोयाबीन उत्पादकांच्या पिक विमा नुकसान भरपाईच्या प्रश्‍नावर धनंजय मुंडे यांनी आवाज उठविल्यामुळे शेतकर्यांच्या आशा आता पल्लवीत झाल्या आहेत.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.