प्रा.माधव मोरे यांच्या स्मृती दिनानिमित्त व्याख्यान व आदर्श कार्यकर्ता पुरस्कार वितरण सोहळा
अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― ‘देशातील वंचित समुहाच्या समकालीन राजकारणाची दिशा’ या विषयावर बोलताना राम गारकर यांनी सांगितले की,आजही देशातील राजकीय सत्ता ही एका जातीच्या किंबहुना काही कुटुंबांच्या हाती एकवटली आहे. देशातील गरीब, अल्पसंख्यांक,दलित, आदीवासी व कष्टकरी माणसाला प्रस्थापित व्यवस्थेने कधीच सत्तेच्या जवळ येवू दिले नाही.त्यामुळे बहुजन समाज हा कायमच सत्तेपासुन वंचित राहिला आहे.या समाजाला सत्ता आणि सन्मान मिळवून देण्यासाठी व भारतीय लोकशाही वाचविण्यासाठी अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांनी बहुजन वंचित आघाडीचा प्रयोग लोकसभा निवडणूकीत केला.हा प्रयोग नवा राजकीय सक्षम पर्याय आहे.या प्रयोगाची दखल आज जगाने घेतली आहे. महाराष्ट्रातील सत्तेची गणिते या प्रयोगाने बदलून टाकली आहेत. बहुजन वंचित आघाडीमुळे प्रस्थापीतांचे धाबे दणाणले आहेत.त्यामुळे त्यांना बहुजन समाजाचे एकीकरण होवू द्यायचे नाही.झालेले एेक्य टिकू द्यायचे नाही म्हणून प्रस्थापीत वर्ग हा पुढील काळात संभ्रम निर्माण करून फुट पाडण्याची शक्यता आहे.तेंव्हा कार्यकर्त्यांनी सजग व डोळस राहून बहुजन वंचित आघाडीच्या पाठीशी पुढील काळातही आपली ताकद,पाठींबा कायम ठेवावा असे आवाहन सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी तथा बहुजन वंचित आघाडीचे लातूर लोकसभेचे उमेदवार राम गारकर यांनी केले.
येथील प्रा.माधव मोरे स्मृती प्रतिष्ठाणच्या वतीने विलासराव देशमुख सांस्कृतिक सभागृह अंबाजोगाई येथे शनिवार,दि.18 मे रोजी प्रा.माधव मोरे यांच्या 26 व्या स्मृती दिनानिमित्त व्याख्यान व आदर्श कार्यकर्ता पुरस्कार वितरण समारोहाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ.अशोक मजमुले हे तर विचारमंचावर व्याख्याते राम गारकर (सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी तथा बहुजन वंचित आघाडीचे लातूर लोकसभेचे उमेदवार), साहेबराव देवराव पोटभरे (नाकलगावकर) या प्रसंगी प्रा.माधव मोरे स्मृती प्रतिष्ठाणचे अध्यक्ष प्रा.एस.जोगदंड आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी फुले-शाहु-आंबेडकर चळवळीतील निष्ठावंत कार्यकर्ते साहेबराव देवराव पोटभरे (नाकलगावकर) यांना आदर्श कार्यकर्ता पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी प्रा.एस. जोगदंड,साहेबराव देवराव पोटभरे (नाकलगावकर) यांनी आपले मनोगत व्यक्त केले व सत्काराला उत्तर दिले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव लंकेश वेडे यांनी केले. तर सुत्रसंचालन माधव काळे यांनी करून उपस्थितांचे आभार सुखदेव भुंबे यांनी मानले.प्रारंभी पत्रकार जगन सरवदे यांनी स्वागतगीताने पाहुण्यांचे स्वागत केले.या कार्यक्रमास अंबाजोगाई शहर व परिसरातील फुले-शाहु-आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, शिक्षण समाजकारण, पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते शहर व परिसरातील गुणवंत विद्यार्थी,शिक्षक,डॉक्टर व प्राध्यापक यांचा त्यांनी त्यांच्या क्षेत्रात दिलेल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल व उत्तुंग यशाबद्दल सत्कार केला.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा.माधव मोरे स्मृती प्रतिष्ठाणचे अध्यक्ष प्रा.एस. जोगदंड,उपाध्यक्ष प्रा.नानासाहेब गाठाळ, सचिव लंकेश वेडे, सहसचिव प्रा.गौतम गायकवाड,सुखदेव भुंबे आदींसहीत सर्व सदस्यांनी पुढाकार घेतला.