सभा घेतलेल्या मतदारसंघात राज्यात १४ ठिकाणी भाजप-शिवसेनेचे खासदार मताधिक्याने विजयी
मुंबई: आठवडा विशेष टीम― राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्या धडाकेबाज नेतृत्वाचा करिश्मा राज्यातही दिसून आला, बीडसह राज्यात त्यांनी घेतलेल्या १९ पैकी १४ ठिकाणी भाजप-शिवसेना महायुतीचे खासदार मताधिक्याने विजयी झाल्याचे काल झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी नंतर स्पष्ट झाले.
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या स्टार प्रचारक असलेल्या ना. पंकजाताई मुंडे यांनी स्वतःचा बीड जिल्हा प्रचारात तर पिंजून काढलाच पण त्याच बरोबर राज्यातही जोरदार प्रचार करून भाजपा महायुतीच्या उमेदवारांना बळ दिले. केवळ भाजपच्याच नाही तर शिवसेनेच्या उमेदवारांसाठी देखील त्यांनी प्रचार सभा घेतल्या. बीड जिल्हयात खासदार डाॅ प्रितमताई मुंडे यांच्या प्रचारासाठी त्यांनी संपूर्ण जिल्हा पिंजून काढताना सहाही विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषद सर्कल निहाय लहान-मोठ्या अशा ३५ ते ४० जाहीर सभा घेतल्या. स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी पार पाडताना राज्यातील इतर मतदारसंघात दिवसा हेलिकाॅप्टरने तीन किंवा चार सभा आटोपून त्या सायंकाळी ५ वा. जिल्हयात दाखल होत रात्रौ दहा वा. पर्यंत तितक्याच म्हणजे तीन किंवा चार सभा घेत असत. सभा संपल्यानंतर पहाटे पाच वा. पर्यंत जिल्हयाच्या प्रचाराचा आढावा व कार्यकर्त्यांच्या भेटी असा त्यांचा दिनक्रम निवडणूकीत नित्याचाच झालेला होता.
फायरब्रॅड नेतृत्वाचा करिश्मा!
लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा राजकीय वारसा लाभलेल्या ना. पंकजाताई मुंडे यांच्या कणखर व फायरब्रॅड नेतृत्वाचा करिश्मा बीडसह राज्यात पुन्हा एकदा दिसून आला. बीडमध्ये डाॅ. प्रीतमताई मुंडे हया १ लाख ६८ हजार ३६८ मतांनी विजयी झाल्या. राज्यात अन्य १९ ठिकाणी त्यांनी भाजप व शिवसेनेच्या उमेदवारांसाठी घेतलेल्या प्रचार सभापैकी १४ ठिकाणी युतीचे खासदार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले, त्यात भाजपच्या १० व शिवसेनेच्या चार खासदारांचा समावेश आहे. पांच ठिकाणी युतीला यश मिळू शकले नाही, त्यांनी सभा घेतलेल्या जागेवर महायुतीचे विजयी झालेले खासदार पुढीलप्रमाणे – भाजप- डाॅ. प्रीतमताई मुंडे (बीड), रावसाहेब दानवे (जालना), प्रताप पाटील चिखलीकर (नांदेड), उन्मेश पाटील (जळगाव), रक्षा खडसे (रावेर), डाॅ. सुजय विखे पाटील (अहमदनगर), मनोज कोटक (मुंबई उत्तर पूर्व), संजय धोतरे (अकोला), रामदास तडस (वर्धा), रणजितसिंह निंबाळकर (माढा), शिवसेना-संजय उर्फ बंडू जाधव (परभणी), हेमंत पाटील (हिंगोली), ओमराजे निंबाळकर (उस्मानाबाद) सदाशिव लोखंडे (शिर्डी) यांचा विजयी उमेदवारात समावेश आहे.
याशिवाय ना. पंकजाताई मुंडे यांनी कांचन कुल (बारामती), शिवाजीराव आढळराव पाटील (शिरूर), चंद्रकांत खैरे (औरंगाबाद), हंसराज अहिर (चंद्रपूर), आनंदराव आडसुळ (अमरावती) आदी उमेदवारांसाठी देखील सभा घेतल्या होत्या.