मुंबई :आठवडा विशेष टीम― अंधश्रद्धा निर्मूलनचे डॉ.नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणी सीबीआयने सनातनचे वकील संजीव पुनाळेकर आणि त्यांचे सहकारी विक्रम भावे यांना अटक केली आहे. या दोघांनाही मुंबईतून अटक करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. संजीव पुनाळेकर यांच्यावर डॉ नरेंद्र दाभोळकरांची हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करणे, हत्येच्या कटामध्ये समाविष्ट असणे आणि आरोपींना मार्गदर्शन करणे असे ३ आरोप आहेत. तर विक्रम भावे याच्यावर डॉ दाभोळकर कोण आहेत हे दाखवणे, डॉ दाभोळकर कोण होते याची माहिती देणे आणि कटात सहभागी असणे हे तीन आरोप आहेत.
सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांनीच डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्यावर गोळ्या झाडल्याचा दावा सीबीआयने यापूर्वी केलेला होता. २०१६ मध्ये सनातनशी संबंधित असलेल्या हिंदू जनजागृती समितीचे सदस्य विरेंद्र तावडेवर आरोपपत्रही दाखल झाले होते. गेल्या वर्षी सीबीआयने काही महत्त्वाच्या व्यक्तींना अटक केल्यानंतर तपासाला वेग आला आहे. त्यात आता पुनाळेकर यांची अटक मोठी घडामोड मानली जात आहे.
पुणे येथे २० ऑगस्ट २०१३ रोजी ओंकारेश्वर पुलावर सकाळी ७.१५ वाजण्यापूर्वी हल्लेखोरांचे दोन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार उपस्थित होते. त्यांनी डॉ. दाभोळकर कोण याची ओळख हल्लेखोरांना करुन दिल्याचे यापूर्वी उघडकीस आले होते. मारेकऱ्यांना डॉ नरेंद्र दाभोळकर यांची खात्री झाल्यानंतर त्यांच्यावर प्रत्यक्ष गोळ्या झाडण्यात आल्या आहेत, असंही समोर आले होते.
Mumbai: CBI team investigating Narendra Dabholkar murder case has arrested two more people, identified as Adv Sanjeev Punakekar and Vikram Bhave. Both have been arrested from Mumbai.
— ANI (@ANI) May 25, 2019
हिंदू विधीज्ञ परिषदचे विक्रम भावे ला २००८ मध्ये ठाण्यातील गडकरी रंगायतन जवळ झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवले आहे. जामिनावर सुटल्यावर तो वकील संजीव पुनाळेकरला मदत करत होता. संजीव पुनाळेकरने शरद कळसकर आणि सचिन अंदुरेला मुंबईतील खाडी पुलावरुन शस्त्र फेकून देऊन नष्ट करण्याची सूचना केली, त्यावेळी विक्रम भावे तेथे हजर होता. अटक केलेल्या दोन्ही आरोपींना उद्या दुपारी पुण्यातील सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात लवकरच अन्य आरोपी अमोल काळे, अमित दिग्वेकर, राजेश बंगेरा यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल केले जाणार असल्याची माहिती सीबीआयच्या सूत्रांनी दिली आहे.