ब्रेकिंग न्युज

रुग्णवाहिकांच्या तत्पर सेवेमुळे ८६४३ वारकऱ्यांची वारी आरोग्यमय


छ. संभाजीनगर, ४ जुलै (प्रतिनिधी):
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या लाखो वारकऱ्यांना कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तातडीने आरोग्यसेवा मिळावी यासाठी महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवेच्या १२० रुग्णवाहिका २४ तास सज्ज आहेत. भारत विकास ग्रुपद्वारे (बीव्हीजी) राज्यात १०८ रुग्णवाहिका सेवेची अंमलबजावणी केली जाते. आतापर्यंत ८६४३ वारकऱ्यांनी या आरोग्यसेवेचा लाभ घेतला आहे, ही माहिती आपत्कालीन वैद्यकीय सेवेच्या नियंत्रण कक्षाकडून प्राप्त झाली आहे.
वारीदरम्यान वारकरी बांधवांना तातडीची वैद्यकीय मदत मिळावी यासाठी पंढरपूर येथे विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. हा नियंत्रण कक्ष पालखी सोहळ्याचे बारकाईने निरीक्षण करत असून, गरजूंना त्वरित आरोग्यसेवा पुरवण्यावर विशेष लक्ष केंद्रित करत आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. प्रकाश अबिटकर यांनी आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त पायी वारी करणाऱ्या भाविकांना तातडीने आरोग्यसेवा मिळावी, अशी सूचना आपत्कालीन वैद्यकीय सेवेला केली होती. आरोग्यमंत्र्यांच्या या सूचनेला प्रतिसाद देत, बीव्हीजीचे चेअरमन हणमंतराव गायकवाड यांनी अवघ्या काही तासांतच १२० रुग्णवाहिका पालखी सोहळ्यासाठी तैनात केल्या. या रुग्णवाहिकांमध्ये १२० डॉक्टर आणि १२८ प्रशिक्षित चालक २४ तास वारकऱ्यांना आरोग्यसेवा देत आहेत.
या प्रसंगी गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली की, “भारताचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरीच्या वारीत भाविकांना आरोग्य सेवा देण्याची संधी मिळतेय, हे मी माझे भाग्य समजतो. माननीय आरोग्यमंत्री अबिटकर साहेबांनी केलेल्या सूचनेनुसार अवघ्या काही तासातच पालखी सोहळ्यासाठी १२० रुग्णवाहिकेचे नियोजन आम्ही केले. वारकऱ्यांना आरोग्यमय वारी अनुभवता यावी यासाठी २४८ आरोग्यदूत अहोरात्र कार्यरत आहेत.”
१०८ रुग्णवाहिकेचे वारीतील नियोजन
आपत्कालीन वैद्यकीय सेवेच्या एकूण १२० रुग्णवाहिका मानाच्या १० प्रमुख पालख्यांसोबत तैनात करण्यात आल्या आहेत. यामध्ये ९० बेसिक लाईफ सपोर्ट (BLS) प्रकारातील आणि ३० ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट (ALS) प्रकारातील रुग्णवाहिकांचा समावेश आहे.
या प्रमुख पालख्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत:
१. संत निवृत्ती महाराज (त्र्यंबकेश्वर)
२. संत ज्ञानेश्वर महाराज (आळंदी)
३. संत सोपान काका महाराज (सासवड)
४. संत मुक्ताबाई (मुक्ताईनगर)
५. संत तुकाराम महाराज (देहू)
६. संत नामदेव महाराज (पंढरपूर)
७. संत एकनाथ महाराज (पैठण)
८. रुक्मिणी माता (कौडानेपूर – अमरावती)
९. संत निळोबाराय (पिंपळनेर – पारनेर अहमदनगर)
१०. संत चांगाटेश्वर महाराज (सासवड)
या विस्तृत नियोजनामुळे लाखो वारकऱ्यांची वारी अधिक सुरक्षित आणि आरोग्यपूर्ण होण्यास मदत झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button