मनरेगाची कामे सुरू करा,बेघरांना घरे व मजुरांना अन्नसुरक्षा द्या―कॉ.बब्रुवाहन पोटभरे
अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― शहर व परिसरात राहणारे वंचित घटकातील गोर-गरीब लोक यांना अंबाजोगाई येथील सरकारी जमिनीवर स्थलांतरीत करून कायमचे घर देण्यात यावे,त्याकरीता जागा मोजून द्यावी,जॉब कार्ड असलेल्या मजुरांसाठी फॉर्म नंबर 4 ची व्यवस्था करावी, मनरेगाची कामे सुरू करून मजुरांना काम द्यावे व अन्न सुरक्षा देण्यात यावी,सदर बाजार मधील वर्मा यांचे रेशन दुकान मुळ गल्लीत आणून ते बचत गटास चालविण्यास द्यावे या व इतर मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष,अंबाजोगाई हा प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहे. विविध निवेदने,अर्ज, विनंत्या,मोर्चा काढुनही या प्रश्नी न्याय मिळत नसल्याने अखेर कॉ.बब्रुवाहन पोटभरे यांच्या नेतृत्वाखाली शिकलकरी समाज व वंचित घटकातील शेकडो गोर-गरीब,मजुर लोक यांनी मिळून सोमवार,दि.27 मे रोजी तहसिल कार्यालयावर तीव्र निदर्शने करून नायब तहसिलदारांना घेराव घातला.तसेच हल्लाबोल आंदोलनाचा इशाराही दिला.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने तहसीलदार,अंबाजोगाई यांना सोमवार,दि.27 मे रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.की,महसूल विभाग हा अत्यंत अकार्यक्षम आहे, मजुरांना काम व अन्न पुरविण्याची जिम्मेदारी सरकारची व महसूल विभागाची असताना याबाबत कसलीही कार्यवाही होत नाही. मागण्यांच्या संदर्भात आम्ही आज रोजी तीव्र निदर्शने करीत आहोत. याची नोंद घ्यावी. मराठवाड्यात व अंबाजोगाई परिसरात दुष्काळाची तीव्रता प्रचंड असतानाही तहसीलदार अंबाजोगाई यांना वारंवार कल्पना देऊनही शेतमजुरांना दुष्काळ निवारणासाठी रोजगार पाणी आणि अन्न यापासून परावृत्त करण्यात आलेले आहे. म्हणून आम्ही हे तीव्र निदर्शने करीत आहोत जॉब-कार्ड असलेल्या मजुरांसाठी फॉर्म नंबर 4 ची ताबडतोब व्यवस्था करा नसता बुधवारी अंबाजोगाई तहसीलवर हल्लाबोल आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी असा इशारा निवेदनाद्वारे कम्युनिस्ट पक्षाचे कॉ.बब्रुवाहन पोटभरे यांनी दिला आहे.विविध प्रकारे हे प्रश्न सोडून घेण्यासाठी कॉ.पोटभरे हे प्रयत्न करीत आहेत.परंतु, प्रशासन या बाबत उदासीन दिसत असल्याने अखेर पोटभरे यांनी हल्लाबोल आंदोलनाचा इशारा आज रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे प्रशासनास दिला आहे.आज सोमवार,दि.27 मे रोजी शिकलकरी समाज व वंचित घटकातील शेकडो स्त्री-पुरूष, वयोवृद्ध नागरिक व लहान मुले,गोर-गरीब लोक यांनी रणरणत्या उन्हात तीव्र निदर्शने केली.तरी या प्रश्नी प्रशासनाने या लोकांना तात्काळ न्याय द्यावा अन्यथा पुढील काळात या पेक्षाही तिव्र आंदोलन करण्यात येईल व झालेल्या परिणामांना शासन व प्रशासन जबाबदार राहिल असा इशारा कॉ.बब्रुवाहन पोटभरे यांनी दिला आहे. तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनावर
कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड बब्रुवाहन पोटभरे,प्रा.कॉ. बाबासाहेब सरवदे,
पुनमसिंग टाक,दिपक गोके,गोरखसिंग भोंड, विरसिंग टाक,अशोक ढवारे,आशाबाई गवळी,छायाबाई तरकसे,मिराबाई पाचपिंडे,देविका भोरे, अनिल ओव्हाळ, अस्मिता ओव्हाळ यांच्या सहीत अनेकांच्या स्वाक्ष-या आहेत. निदर्शनात अॅड.कॉ.अजय बुरांडे,
सार्वजनिक बांधकाम विभाग परिसरातील शिकलकरी समाज, मिलींदनगर व येल्डा रोड परिसरातील शेकडो बेघर कुटुंबे,वंचित समाज बांधव हे सहभागी झाले होते.