बीड जिल्हयाची जनता मला ईश्वराच्या जागी, त्यांच्यासमोर मी नतमस्तक―पंकजा मुंडे

आ.भीमराव धोंडेंच्या मुलाच्या विवाह सोहळ्यात उपस्थितही भारावले

बीड दि.२९: कोणत्याही शुभ कार्याची सुरवात आपण ईश्वराचे दर्शन घेऊन करतो, माझा ईश्वर म्हणजे या जिल्हयातील जनता आहे, त्यांच्यासमोर मी नतमस्तक होते असे सांगून शेवटच्या श्वासापर्यंत जनतेची सेवा करत राहील अशा शब्दांत राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी भावना व्यक्त केल्यानंतर उपस्थितही भारावून गेल्याचे आज आष्टीत दिसून आले.

आष्टी-पाटोद्याचे आमदार भीमराव धोंडे यांच्या मुलाचा म्हणजे अजय चा विवाह सोहळा आज आष्टी येथे मोठ्या उत्साहात पार पडला, त्यावेळी जमलेल्या मतदारसंघातील व जिल्हयातील जनतेसमोर ना. पंकजाताई मुंडे वधू – वरांना शुभाशिर्वाद देतांना बोलत होत्या.

भाजप कार्यकर्त्यांच्या कुटूंबातील विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी ना.पंकजाताई मुंडे आज हेलिकाॅप्टरने जिल्हयात आल्या होत्या. परळी येथे वैद्यनाथ साखर कारखान्याचे संचालक पांडूरंगराव फड यांचे नातू प्रवीण फड यांच्या विवाहा प्रसंगी नव दाम्पत्यांना प्रत्याक्षात भेटून त्यांनी शुभेच्छा दिल्या व आष्टीकडे रवाना झाल्या. खासदार डाॅ. प्रितमताई मुंडे यांच्या लोकसभा निवडणुकीतील घवघवीत यशानंतर जिल्हयातील जनतेचे आभार मानण्याचा योग यानिमित्ताने आल्यामुळे आ. धोंडे यांच्या मुलाच्या विवाहात त्या जनतेसमोर नतमस्तक झाल्या.

आ.धोंडे यांच्या मुलाच्या विवाहात पुढे बोलतांना ना पंकजाताई म्हणाल्या की, माझा ईश्वर म्हणजे या जिल्हयातील जनता आहे. सर्व सामान्य जनतेचे ॠण माझ्यावर आहे, शेवटच्या श्वासापर्यंत जनतेची सेवा केली तरी या ॠणाची उतराई होवू शकणार नाही. जनतेचे आशीर्वाद मला ईश्वरापेक्षाही लाख मोलाचे आहेत अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत जनतेचे आभार मानले.

भाजपचे शिरूर येथील कार्यकर्ते विवेक पाखरे यांच्या बहिणीच्या विवाह सोहळ्यास देखील ना. पंकजाताई मुंडे यांना उपस्थित रहायचे होते परंतू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहण्याविषयी भाजपच्या कार्यालयातून निरोप आल्याने त्या तातडीने दिल्लीला रवाना झाल्या, तरीही एवढ्या घाई गडबडीत त्या नव दाम्पत्यांना शुभेच्छा देण्यास विसरल्या नाहीत.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.