लग्नघरातील चार जणांचा भीषण अपघातात मृत्यू, एक चिंताजनक
बीड दि.२४ : ट्रक व कारची समोरा समोर जोराची धडक होऊन झालेल्या अपघातात कारमधील चार तरुण ठार तर एकजण गंभीर जखमी झाला. हा भीषण अपघात रविवारी सकाळी धुळे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर शहराजवळील पाली येथे झाला. अंबाजोगाई तालुक्यातील बोरी सावरगाव येथील तरुणाच्या लग्नासाठी हे सर्व कपिलधारला आले होते. मृतात नवरदेवाच्या भावाचा समावेश आहे.
तेजस सुभाष गुजर (रा. बोरीसावरगाव, ता. अंबाजोगाई), अक्षय उर्फ आकाश रामलिंग गाढवे (रा. धानोरा, ता. अंबाजोगाई), सौरभ अरुण लोहारे आणि मंगेश मल्लिकार्जुन कुंकूकरी (दोघेही रा. लातूर) अशी मयत तरुणांची नावे आहेत. तर शुभम दत्तात्रय उंबरे (रा. उस्मानाबाद) हा तरुण गंभीर जखमी झाला. जखमी शुभमवर बीड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. हे सर्व तरुण २५ ते ३० वयोगटातील असून शुभम वगळता उर्वरित सर्व एकमेकांचे जवळचे नातेवाईक आहेत. तेजस गुजरच्या भावाचे रविवारी कपिलधार येथे लग्न असल्याने हे सर्व तिकडे गेलेले होते. काही कामानिमित्त हे पाच तरुण बीडकडे गेले असताना हा भीषण अपघात झाला.