मराठवाडा दुष्काळमुक्त करुन गोपीनाथराव मुंडे यांचे स्वप्न पूर्ण करु―मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृतीदिनी गोपीनाथगडावर उसळला जनसागर !

जनतेचे प्रेम व विश्वास जिंकलाय आता आणखी विकासातून ऋण फेडायचेय – ना.पंकजाताई मुंडे

परळी दि.०३: मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याचे गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न साकारण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. कृष्णा खोऱ्यातील मराठवाडय़ाच्या हक्काचे ६० टीएमसी पाणी दिले जाईल. मराठवाडय़ात इस्राईलच्या मदतीने वाॅटर ग्रीड तयार करण्यात येणार असून पाच डीपीआर मंजूर करण्यात आलेले आहेत. दुष्काळाची चिंता करू नका त्यासाठी प्रसंगी शासनाचा खजिना रिकामा झाला तरी चालेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोपीनाथ गड येथे दिली. जनतेची मी मोठी कर्जदार असून जनतेचे प्रेम व विश्वास जिंकलाय आता विकास करायचाय अशी ग्वाही देत विरोधकांनी जातीपातीचे गलिच्छ राजकारण करून दिलेल्या दुःखाची व्याजासकट परतफेड करू असा घणाघात राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी केला.

 गोपीनाथ गड येथे लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पाचव्या पुण्यस्मरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती.या वेळी केंद्रीय मंत्री तथा भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मंत्री महादेव जानकर, नवनिर्वाचित खासदार सुधाकर शृंगारे, संजय जाधव, प्रताप पाटील चिखलीकर, हेमंत पाटील, जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, डॉ सुजय विखे पाटील, ओमराजे निंबाळकर, रणजित नाईक निंबाळकर, आ. सुरजीतसिंह ठाकूर, तानाजी मुरकुटे, आ.अतुल सावे,आ मोनिका राजळे, स्नेहलता कोल्हे, विनायक पाटील, आ. मोहन फड, आ.तानाजी मुटकुळे, आ. आर. टी. देशमुख, आ.भीमराव धोंडे, आ.लक्ष्मन पवार, आ.संगीता ठोंबरे, आ. माधुरी मिसाळ, भागवत कराड, शिरिष बोराळकर, जि. प. अध्यक्षा सविता गोल्हार, हभप राधाताई सानप, रमेश पोकळे आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

   पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील सरकार  लोकनेते गोपीनाथराव मुंडेंच्या विचाराचे सरकार आहे. त्यामुळेच त्यांना अभिप्रेत असेच निर्णय आम्ही घेतले व घेणार आहोत. पंकजाताई समर्थपणे नेतृत्व करत आहेत.त्यामुळे पंकजाताईंनी गोपीनाथराव मुंडे यांचे नाव नाही लावायचे तर काय करंट्या लोकांनी लावायचे का? असा सवाल करून वडिलांचे नांव लावण्यावरून टिका करणाऱ्या विरोधकांना लोकसभा निवडणुकीत बीडच्या जनतेने जागा दाखवून दिली आहे. राज्यातील भाजपच्या यशात गोपीनाथराव मुंडे यांचा वाटा आहे. मुंडे- महाजन यांच्या पायाभरणीमुळे राज्यात पक्षाला हे यश मिळाले. आम्हाला मुंडे साहेबांनी घडवले आहे. तसेच पंकजा आणि प्रीतम मुंडे या सामान्यांसाठी काम करत गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न साकारत आहेत. मराठवाड्याला दुष्काळ मुक्त करण्याचे   गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल.यासाठी वाॅटर ग्रीड आणि कृष्णा खोऱ्याचे पाणी मराठवाड्यात आणणे असे प्रकल्प मराठवाड्यात राबविण्यात येणार आहेत.राज्य सरकार दुष्काळी परिस्थितीशी हाताळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशीलआहे. दुष्काळी भागात दुष्काळी अनुदान थेट खात्यात जमा करण्यात आले आहे.चारा छावण्या  सुरू करण्यात आलेल्या आहेत. दुष्काळाशी सामना सुरू असून यासाठी सरकार दुष्काळी भागात जनतेच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. दुष्काळमुक्त मराठवाड्यासाठी आवश्यक ते सर्व करणार असून यासाठी प्रसंगी खजिना रिकामा करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ना. पंकजाताईंचे घणाघाती भाषण

ना. पंकजाताई मुंडे यांनी यावेळी घणाघाती भाषण केले. आपले पिता तथा लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या आठवणींना उजाळा देत ना. पंकजाताई मुंडे यांनी सांगितले की, ३ जुन हा मुंडे साहेबांचा स्मृतीदिन हा दिवस आमचे सर्वस्व हरवल्याचा दिवस आहे. परंतु मुंडे साहेबांची लेक असल्याने रडत न बसता लढण्याचा निर्धार करुन मी संघर्ष स्विकारला. समाजातील प्रत्येक समाज घटकाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. शेतकरी, शेतमजूर व वंचितांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. खुप लोकांनी दुःख यातना दिल्या.पण मी डगमगले नाही.या निवडणुकीत मला अनेक लोकांनी शिकवलं.मी लोकांचं ऐकलं पण मनाचं केलं. कारण मुंडे साहेबांची शिकवण अशी होती की “खेल ताश का हो या जिंदगी का,अपना एक्का तब ही दिखाना जब सामने बादशहा हो” पण माझ्यावर ती वेळ आली नाही कारण समोर चिल्लर होते. सामान्य माणसाला सत्तेचा लाभ मिळवून देण्यासाठी सतत प्रामाणिक प्रयत्न केला. लोकांचा विश्वास जिंकलाय आता विकास करायचाय अशी ग्वाही त्यांनी दिली. ” जो दर्द तुम किश्तो किश्तो मे दे रहे हो,वो आलम क्या होगा जब हम ब्याजसमेत वापस करेंगे” असे म्हणत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

यावेळी सर्वश्री रावसाहेब दानवे, खा. सुजय विखे पाटील, खा.संजय जाधव, रणजितसिंह निंबाळकर, प्रताप पाटील चिखलीकर, हरिभाऊ बागडे आदींनी आपल्या भाषणात मुंडे साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. याप्रसंगी मराठवाड्यातील सर्व नवनिर्वाचित खासदारांचा सन्मान मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.

रोजगार मेळाव्याची मोठी उपलब्धी ; २६८३ जणांना नोकऱ्या


गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान व पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजनेच्या वतीने आयोजित रोजगार मेळाव्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या मेळाव्यातून बीड जिल्हयातून व बाहेरून ४ हजार १२९ लाभार्थ्यांची नोंदणी झाली. त्यापैकी २ हजार ६८३ लाभार्थ्यांना विविध महानगरातील नामांकित कंपन्यांमध्ये नोक-या मिळाल्या, ही आजच्या मेळाव्याची फार मोठी उपलब्धी आहे, ना. पंकजाताई मुंडे यांनी याबाबतची माहिती त्यांना दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक खा. डाॅ.प्रीतमताई मुंडे यांनी केले. सुत्रसंचलन राम कुलकर्णी यांनी तर आभार प्रदर्शन भाजप तालुकाध्यक्ष शिवाजी गुट्टे यांनी केले.

क्षणचित्रं

• लोकनेत्याच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी तसेच कार्यक्रमासाठी महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून कार्यकर्त्यांची गर्दी उसळली ; शिस्तबद्ध रितीने रांगेत उभे राहून सर्वानी दर्शन घेतले

• रखरखत्या उन्हातही प्रचंड गर्दी; लोकांना बसायला मंडप अपुरा पडला, मंडपाच्या बाहेर मिळेल त्या जागेवर उभा राहून उपस्थितांनी कार्यक्रम ऐकला.

• सकाळी ११ वा. ह.भ.प. ढोक महाराज यांचे सुश्राव्य किर्तन झाले, त्यानंतर दुपारी १.१० वा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकाॅप्टरने गोपीनाथ गडावर आगमन झाले. कार्यक्रम स्थळी येण्यापूर्वी त्यांनी मुंडे साहेबांच्या समाधीचे दर्शन घेतले.

• ग्रामीण भागातील तरूणांसाठी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यातील स्टाॅलला मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. ना.पंकजाताई मुंडे यांनी त्यांना मेळाव्याची माहिती दिली.

• उतणार नाही, मातणार नाही, घेतला वबा टाकणार नाही या मुंडे साहेबांच्या वचनाप्रमाणे आपण समाज सेवेचे व्रत आयुष्यभर जतन करू अशा आवेशपूर्ण भाषणाने खा. डाॅ. प्रितमताई मुंडे यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

• ना. पंकजाताई मुंडे यांच्या मातोश्री प्रज्ञाताई मुंडे हया कधीच जाहीर व्यासपीठावर येत नाहीत. आजही त्यांनी श्रोत्यांमध्येच बसून कार्यक्रम ऐकला. व्यासपीठावर डाॅ. अमित पालवे व गौरव खाडे हे उपस्थित होते.

• गोपीनाथ गड परिसरात ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

• मराठवाड्यातील आमदार, खासदार भाजपा, शिवसेना, रिपाइंचे तसेच विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतले समाधीचे दर्शन

• मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उपरणे व तुळशी वृंदावन देऊन भाजप शिवसेना युतीच्या नवनिर्वाचित खासदारांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

• कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, खासदार, आमदारांसह सर्व सामान्य जनतेनेही याचा लाभ घेतला. अतिशय शिस्तबद्ध वातावरणात कार्यक्रम पार पडला.

• मुख्यमंत्र्यांसह अनेक राजकीय मंडळी येणार असल्याने पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.