छत्रपती संभाजीनगर,दि.२६(जिमाका):- देशी गोवंशाचे संवर्धन, संरक्षण व कल्याणासाठी महाराष्ट्र गोसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली असून गोशाळांना देशी गोवंशासाठी प्रति दिन प्रति गोवंश ५० रुपये अनुदान देण्याची योजना राबविण्यात येत आहे. त्यासाठी गोसेवा आयोगाकडे नोंदणी झालेल्या गोशाळांकडून ३१ डिसेंबर पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत,असे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एन.एस. कदम यांनी कळविले आहे.
गोसेवा आयोगाकडे नोंदणी झालेल्या व ५० पेक्षा जास्त गोवंश संख्या असलेल्या गोशाळांनी या योजनेसाठी दि.३१ डिसेंबर पर्यंत http://mhgosevaayog/form_goshala3/ या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे. सादर केलेल्या अर्जांची आयोगामार्फत दि.१ ते १० जानेवारी २०२५ या कालावधीत तपासणी करण्यात येणार आहे. प्राथमिक तपासणीनंतर ११ ते २० जानेवारी २०२५ दरम्यान प्रत्यक्ष गोशाळांची भेट देऊन पडताळणी करण्यात येईल. त्यानंतर पात्र ठरणाऱ्या गोशाळांचे प्रस्ताव आयोगाकडे पाठविण्यात येतील. तरी जिल्ह्यातील गोशाळांनी आपले प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने अर्ज करुन पाठवावे. अधिक माहितीसाठी तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी, पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अथवा उपायुक्त कार्यालय, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय अथवा नजिकच्या पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एन.एस. कदम यांनी केले आहे.