छत्रपती संभाजीनगर,दि.२६:- वनेतर क्षेत्रातील वृक्षारोपण व संवर्धनात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थाना छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार दिला जातो. सन २०२४ करीता या पुरस्कारासाठी वृक्षरोपण संवर्धनाचे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
सामाजिक वनीकरण विभागामार्फत व्यक्ती, ग्रामपंचायत, शैक्षणिक संस्था, सेवाभावी संस्था, ग्राम, विभाग/ जिल्हा या संवर्गात हा पुरस्कार दिला जातो. मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व महसूल विभागस्तरावर प्रथम पुरस्कार ५० हजार रुपये व द्वितीय पुरस्कार ३० हजार रुपेय, राज्यस्तरावर प्रथम पुरस्कार १ लाख रुपये, द्वितीय ७५ हजार रुपये व तृतीय ५० हजार रुपये दिले जातात. तसेच वृक्षमित्र पुरस्कार वृक्षरोपण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या तीन खाजगी संस्थांना प्रोत्साहनपर प्रत्येकी २५ हजार रुपये या प्रमाणे पुरस्कार दिला जातो. पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्ति/ संस्थांनी गेल्या तीन वर्षात (२०२१ ते २०२३) केलेले कार्य ग्राह्य धरले जाते. इच्छुक व पात्र संस्थांनी विहित नमुन्यात जिल्हा, विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग यांच्या कार्यालयात अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत दि.१५ जानेवारी २०२५ आहे. तर विहित नमुन्यातील अर्ज संबंधित विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग यांच्या कार्यालयात किंवा वन विभागाच्या www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत,असे कळविण्यात आले आहे.