कै.बालासाहेब ठोंबरे स्मृती समारोहातील कविसंमेलन ठरले दीपस्तंभ

“शुद्ध वर्तनासाठी कविता,लिहा गड्यांनो माणुसकीच्या भरण पोषणासाठी कविता.” -डॉ.मुकुंद राजपंखे

अंबाजोगाई (प्रतिनिधी): कर्मयोगी डॉ. बालासाहेब ठोंबरे -पाटील यांच्या स्मृती दिनाच्या पुर्वसंध्येला शनिवार,दि.1 जून रोजी उंदरी येथे कवितेची सुरेल मैफिल रंगली. विविध विषयांवर मौलिक चिंतन मांडणारे हे कवीसंमेलन रसिक श्रोत्यांच्या उत्स्फुर्त दाद व प्रतिसादामुळे ‘वन्समोअर’ ठरले.

या कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कुलसचीव डॉ. दिगांबरराव चव्हाण हे होते.कवि संमेलनाचे उदघाटन ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा यांच्या हस्ते झाले.मार्गदर्शक म्हणून दै.विवेकसिंधूचे संपादक प्रा.नानासाहेब गाठाळ यांची विशेष उपस्थिती होती.या प्रसंगी प्रमुख उपस्थितांमध्ये सौ. नमिताताई अक्षय मुंदडा व यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचे सचीव दगडू लोमटे,सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ.बाबासाहेब ठोंबरे हे मान्यवर विचारमंचावर उपस्थित होते.कर्मयोगी प्राचार्य बालासाहेब ठोंबरे-पाटील स्मृती प्रतिष्ठानचे हे चौथे वर्ष.चौथा स्मृती सोहळा.या प्रसंगी मान्यवरांनी दीपप्रज्ज्वलीत करून व कै.माणिकराव ठोंबरे पाटील व कै.डॉ. बालासाहेब ठोंबरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून कविसंमेलनाला हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि कृतार्थ आयुष्य जगलेल्या प्राचार्य डॉ. बालासाहेब ठोंबरे यांच्या जीवन कार्याबद्दल गौरवोद्गार व्यक्त केले.हे प्रतिष्ठान उंदरी गावात सामाजिक सलोख्याचे काम करत आहे याचा आनंद दगडू लोमटे यांनी व्यक्त केला.
तर यावेळी आपण खेडूत आहोत हा न्युनगंड काढा.मुलींना मुलांपेक्षा कमी समजू नका,त्यांनाही शिकू द्या असे म्हणाले जेष्ठ संपादक प्रा.नानासाहेब गाठाळ.सौ.नमीता अक्षय मुंदडा यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे गावाला ऊर्जा मिळत असल्याचे नमूद केले.जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी ठोंबरे कुटुंबीय हे एकत्र कुटुंब पद्धतीचं उत्तम उदाहरण असल्याचे सांगून भावा-भावातील अतूट जिव्हाळा दिसून आल्याचा आनंद व्यक्त केला.यावेळी उद्घाटन सत्राचा अध्यक्षीय समारोप करताना डॉ.दिगांबरराव चव्हाण यांनी हा कार्यक्रम ग्रामिण भागात मोठं प्रबोधन करत असल्याचा आनंद व्यक्त करून कै.प्राचार्य बालासाहेब ठोंबरे यांच्या स्मृतीला उजाळा दिला.उदघाटन सोहळ्याचे प्रास्ताविक सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ.बाबासाहेब ठोंबरे यांनी केले. थोरल्या भावाच्या स्वप्नांसाठी हा उत्सव असल्याचे सांगून प्रतिष्ठानच्या भूमिकेचा आढावा मांडला.या आरंभाच्या सत्राचा कल्पक सूत्रसंवाद प्रा. डॉ.दिगांबर मोरे यांनी तर भावोत्कट आभार अनुराधा ठोंबरे-सुर्यवंशी यांनी मानले.

मोहरलेले कविसंमेलन

कविसंमेलनात सूत्रसंवादाची भूमिका कवी तथा विडंबनकार प्रभाकर साळेगावकर (माजलगाव) यांनी बहारदार रितीने निभावली.तर कविसंमेलनात कवी तथा गजलकार डॉ.मुकुंद राजपंखे (अंबाजोगाई),
दगडू लोमटे (अंबाजोगाई),अर्चना पौळ-सूर्वे(परभणी), राहूल गदळे(केज),
जनार्धन सोनवणे(केज),
विक्रम डोईफोडे (केज), आणि अनुराधा ठोंबरे-सूर्यवंशी (लातूर) हे सहभागी झाले.या सर्व कविंनी आपल्या कवितांनी तब्बल दोन तास संमेलनाचा माहौल झुलवत ठेवला.
दगडू लोमटे यांनी दोन कविता एेकवताना एक स्वगत ‘बोलुयात का ?’ आणि ‘पाऊस’ही रचना एेकवली.
“माणसा माणसातला दुरावा सांधुयात.
की,ही दरी कशी वाढेल या विषयी
कट-कारस्थान रचन्याविषयी बोलुयात.
रोज कृत्रिम नाते जपताना मूळ नाते कुठे गायब झाले कधीचे त्यावर बोलुयात ?
की,स्वत:च्या स्वार्थात रुतून बसलेल्या माणसांविषयी बोलुयात ?”दगडू लोमटे यांनी हे स्वगत एेकवून माणसांच्या जगण्यातील उणीवांवरती नेमकेपणाने बोट ठेवले. आपल्या दुस-या
‘पाऊस पडना पडना’
या रचनेतून पावसाचं तेंव्हाचं आणि आत्ताचं वर्तन दाखवून दिलं. बालपणी पावसाचा लुटलेला आनंद आता लुटता येत नसल्याची खंत यात आहे.
“मुलांच्या पाठीवरली दप्तरं बघितली की तीन तपापुर्वी पत्र्याच्या घरात जात्यावर दळणारी माझी आई मला समोरंच दिसते…
तेंव्हा माझं दप्तर म्हणजे …
एक पाटी,एक लेखणीचा तुकडा
झालंच तर पाटी पुसायला फडकं
अन् तिनं हातानं षटकोणी-षटकोणी विनलेली पिशवी…
तरीही जात्यावर दळता दळता मी दिसलो की, गोड गळ्यावर म्हणायची …
“साळंची गं घंटा, घणाघणा वाजं
बंडू बाळाला गं माझ्या होई दप्तराचं ओझं. ”
दप्तराच्या ओझ्यानं वाकलेली मुलं बघितली की आईचं तेच गाणं कानात रुंजी घालंत राहतं…की,माझ्या शिकलेल्या मनाला हे पटंतच नाही की तीन तपं पुढं बघणारी माझी आई…
म्हणे शिकलेलीच नव्हती !”-माजलगांव येथील ज्येष्ठ कवी प्रभाकर साळेगावकरांच्या या कवितेने गावाकडल्या आडाणी म्हणून अव्हेरलेल्या आईच्या, मातृप्रेमाच्या,कुटुंबाच्या सुंदर जगण्याचा विचार समोर ठेवला आहेे. दप्तरांच्या ओझ्याखाली दडपलेली शिक्षण व्यवस्था कशी मूळ गाभ्यापासून दुरावत चाललेली आहेे,याची गंभीर दखंल घेते.“शूर आम्ही सरकार आम्हाला काय कुणाची भीती.टोल,ग्यास अन् महागाईने प्राण घेतलं हाती” या विडंबनाने समकालीन राजकारणावर साळेगावकरांनी ताशेरे ओढले.जनार्धन सोनवणे (केज) या कवीने शिक्षणाकडं समाजाचं दुर्लक्ष होत असलेल्याेलं हेरुन जात-धर्म आणि राजकारण यावर कडाडून प्रहार करताना ही कविता एेकवली…
जो तो उठतो,जोगवा मागतो जातीसाठी,
कुणीच का मागंत नाही माणुसकीच्या मातीसाठी ?
जातीच्या जोगत्यांनो !
कवडीमाळ गळ्यासाठी,
एकदा तरी मागा, लेकरांच्या खडूफळ्यासाठी.
विक्रम डोईफोडे या सहशिक्षक असलेल्या कवीने शेतकरी,कष्टकरी माणसांची दुष्काळाने मांडलेली कैफियत शब्दबद्ध केली.ती अशी.
“दुष्काळानं नेला यांचा बाप अनवाणी माझी पोरं,कर्जामधुन मुक्तिसाठी त्यानं गळा लाविला दोर.” ही आत्महत्या केलेल्या नव-याच्या बायकोचा टाहो आहेे.बहि-या सरकारच्या कानावर घातलेलं हे गार्हानं आहेे.
अर्चना पौळ(परभणी) या कवयत्रीने आपल्या दोन रचना एेकवल्या. ‘बुद्धी भ्रम’ या एका रचनेतून ‘आत्म्याच्या आतून निघालेला सूर म्हणजे पुण्य’हा सद्विचार मांडला. ‘शिवबा आकाशा एवढा’ ही रचना’ या रचनेतून शिवरायांबद्धलचा आदरभाव व्यक्त केला.
“भोसल्यांच्या कुळात जन्मलेले तुम्ही एक रत्न होतात साधू संतांच्या कल्पनेतला
सात्विकतेचं स्वप्न होतात.” पञकार व कवी राहूल गदळे या (केज) यांनी आपल्या दोन कविता एेकवताना एक मार्मिक वात्रटिकात्मक चारोळी ऐकवली…
“गावात दारू पिईल त्याला सरपंचाने दंड केला,अन् दंडाच्या पैशाची सरपंच दारू पिवून आला. “शहरीकरणाचं हे असंही भयंकर भय गदळे यांनी व्यक्त केलं.
“आता शेवटी एकच भिती वाटते
मी शेवटी तरी गावी जाईल का ?
माझ्या मातीत,माझ्या माणसात माझी माती होईल का ?”.यावेळी
अनुराधा ठोंबरे-सूर्यवंशी या स्व.बालासाहेब ठाेंबरे यांच्या कन्येनेही आपल्या भावना काव्यातून व्यक्त करताना वडीलांबद्दलचा अपार आदरभाव व्यक्त केला.दाटुनी येते अंत:करणयात
आठवणींचा माजतो काहूर एकटेपणाची वाटते हुरहुर मायेचे छत्र हिरावून गेले क्षणात मला पोरके केले
रखरखत्या उन्हाची वाटते भिती मनाला खोटे समजावायचे किती ?” ही जन्मदाता गेल्यानंतरची आता कुण्याही लेकरांना वाटावी अशी न भरुन निघणारी सखोलवर जाणवणारी वडीलांची उणीव कवितेतून व्यक्त केली.मोबाईलवरील आपली दुसरी रचना एेकवताना,
“ओळखीचे लोक धूसर झाले अनोळखीशी नाते जोडले.इंटरनेटचे जाळे पसरले,त्यात लोक पुरते अडकले.संभाषणाचा भासतोय तुटवडा. शुभेच्छांचा मात्र फोनवरचं मारा.
लाईक्स आणि कॉमेंट्सचा नुसता पसारा,गरजेला धावून येतो,तोच मित्र खरा! ”
हे समकालीन वास्तवही उपस्थितांसमोर मांडलं.
या उपक्रमाचे हे सलग चौथे वर्ष हा स्मृती समारोह उंदरी येथे संपन्न होतो आहेे.सलग चारही वर्षे कवी तथा गजलकार प्रा.डॉ.मुकुंद राजपंखे कविसंमेलनाच्या माध्यमातून या उपक्रमांशी जुळलेले आहेेत.या वर्षी कै. बालासाहेब ठोंबरे प्रतिष्ठानने डॉ.राजपंखे यांच्या ग्रामिण जीवनाशी जुळलेला सूर त्यांना “कर्मयोगी डॉ. बालासाहेब ठोंबरे-पाटील स्मृती कवी तथा गजलकार पुरस्कार देवून गौरविले आहेे. सातत्यपुर्ण मूल्यवर्धीत काव्यलेखन आणि अंत:करणपुर्वक सादरीकरणाचा हा सन्माण होय.
यावेळी गजलकार
डॉ.मुकुंद राजपंखे यांनी आपल्या ग्रामजीवनातील अनुभूतींच्या कविता एेकविल्या.आपल्या दिलखुलास सुसंवादातुन गजलांनी, कवितांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. “सनकाड्या पेटवणीच्या कामाच्या,
तग धरून जळंत नाहीत,म्हणून माय चार-दोन सनकाड्याय सोबत दोन-चार सडं घालायची चुलीत.एकदा का निब्बर काटकायनी जाळ धरला की ढपली.एखादं दुसरं खांड सारायची चुलीत.
हवा खेळती ठेवतात म्हणून चुली धुपंत नाहीत.बाया वले लाकडं चुलीला जुंपत नाहीत.”
हे गावपातळीवरलं चुली पेटवण्याचं पारंपारीक तंत्रज्ञान डॉ.राजपंखे यांनी अत्यंत मार्मिक रूपकांच्या माध्यमातून उलगडून दाखवले.ही माणसांची पारख समाजधुरीनांना,सर्व पातळ्यांवरील नेतृत्व करणा-या मंडळींना असायला हवं.कविता कशासाठी,कुणासाठी…
गावोगावी कविता का ऐकवायची ?
पिढ्यान् पिढ्या गावं तुकोबाचा जागर घालताहेत कारण,त्यात जगण्याची ऊर्जा आहेे. हा धागा धरुन पुरस्काराबद्दलची कृतज्ञता व्यक्त करताना तमाम कवींच्याच वंद्य लेखण्यांना उद्देशून डॉ. राजपंखे म्हणाले.की,
“शुद्ध वर्तनासाठी कविता दिशा दर्शनासाठी कविता लिहा गड्यांनो माणुसकीच्या
भरण-पोषणासाठी कविता.” उत्तर राञी पर्यंत रंगलेल्या या कविसंमेलनाला तमाम उंदरीकर आणि आसपासच्या गावातील ठोंबरे कुटुंबियाशी आणि कवितेशी ऋणानूबंध असलेली मान्यवर मंडळी,शेतकरी बांधव, तरूण हे मोठ्या संख्येने उपस्थित होती.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.