बीड : कंदुरीच्या जेवणातून ७४ जणांना विषबाधा ; १४ लहान मुलांचाही समावेश,अनेकांची प्रकृती गंभीर

बीड : आठवडा विशेष टीम― बीड शहरातील धानोरा रोडवरील बाबासाहेब गोखले यांच्या घरी मंगळवारी रात्री जागरण गोंधळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमात दिल्या गेलेल्या जेवणातून तब्बल ७४ जणांना विषबाधा झाली. ही घटना शहरातील धानोरा रोड भागात मंगळवारी (दि.११ जून) रात्री घडली. जेवणानंतर एक ते दीड तासात अनेक जणांना उलटी, मळमळ असा त्रास होऊ लागल्याने सर्वांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. विषबाधा झालेल्यामध्ये १४ लहान मुलांचा समावेश आहे. सर्वांची प्रकृती आता स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले असल्याची माहिती मिळत आहे.

शहरातील धानोरा रोडवरील बाबासाहेब गोखले यांच्या घरी मंगळवारी रात्री जागरण गोंधळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रम पार पडल्यानंतर रात्री उशिरापर्यंत सर्वांनी या ठिकाणी जेवण केले. कंदुरीतील मटन खाल्ल्यानंतर एक ते दीड तासाच्या आसपास सर्वांना उलटी मळमळ आणि संडासचा त्रास होऊ लागला असल्याचे लक्षात आल्यानंतर मिळेल त्या वाहनाने तातडीने सर्वांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. कमी अधिक प्रमाणात सर्वांना विषबाधा झाल्याचे स्पष्ट झाले.
रात्री ११ ते पहाटे ३ वाजेपर्यंत सर्वांवर योग्य ते उपचार सुरू करण्यात आले. त्यानंतर सकाळी सर्वांची प्रकृती स्थिर झाली. विषबाधा झालेल्या ३६ जणांवर वार्ड क्रमांक ६ मध्ये तर २३ जणांवर वार्ड क्रमांक ८ मध्ये उपचार सुरू करण्यात आले तर वॉर्ड क्रमांक ९ मध्ये १५ जणांवर उपचार सुरू आहेत. विषबाधेची माहिती मिळाल्यानंतर अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुखदेव राठोड, वैद्यकीय अधिकारी बाळासाहेब टाक, महेश माने, यांच्यासह इतर डॉक्टर, परिचारिका यांनी रुग्णांवर उपचार सुरू केले. पहाटे ३ वाजता अन्न औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त कृष्णा दाभाडे यांच्यासह अन्न निरीक्षक ऋषिकेश मरेवार व कर्मचाऱ्यांनी रूग्णालयाला भेट दिली. सर्वांना अन्नातून विषबाधा झाल्याचे डॉक्टरांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर अन्न नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. आज सकाळी प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
विषबाधा झालेल्यामध्ये भाऊराव पोटे, भाऊराव कोठुळे, संतोष खंडागळे, श्रीराम वराट, अनिकेत कवडे, शुभम वाकडे, गणेश कोठारे, बळीराम वराट, आत्माराम जाधव इंद्रजीत आगलावे, गणेश तुपे, विठ्ठल शेळके, कृष्णा मस्के, अक्षय साबळे, बिभीषण भांडवलकर, विकास गायकवाड ७४ जणांचा समावेश आहे.
अन्न नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत
कंदुरीतुन विषबाधा झाल्याचे लक्षात आल्यानंतर ही माहिती अन्न औषध प्रशासनाला माहिती देण्यात आली. सहाय्यक आयुक्त कृष्णा दाभाडे, अन्न सुरक्षा अधिकारी ऋषिकेश मरेवार, अनिकेत भिसे व इतर कर्मचारी जिल्हा रुग्णालयात दाखल झाले.कंदुरीसाठी बनविलेला मटणाचा रस्सा, भात, वांग्याची भाजी, बाजरीच्या भाकरीचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. सर्व नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून अहवाल आल्यानंतर विषबाधेचे कारण स्पष्ट होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.