मराठी भाषेचे विद्यापीठ अंबाजोगाईला व्हावे या मागणीला बळ देणारा ग्रंथ―प्रा.भगवानराव शिंदे

आद्यकवी मुकुंदराज स्वामी जीवनदर्शन चरित्र ग्रंथाचे विमोचन

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― मराठी भाषेतील आद्यकवी मुकुंदराज स्वामी यांचे जीवन दर्शन (चरित्र) लिहून ते महाराष्ट्राला उपलब्ध करून दिल्यामुळे आद्यकवीं बाबतची विस्तृत माहिती या ग्रंथातून मिळाली त्यामुळेच अल्पावधीत वाचकप्रिय झालेल्या व इतिहासाचा समृद्ध ठेवा असणारा हा चरित्र ग्रंंथ अध्यात्म प्रेमी,रसिक, संशोधक,अभ्यासक यांच्यासाठी उपयुक्त आहे.प्रत्येकाने हा संग्रह करावा असाच आहे. सदर चरित्र ग्रंथाची दखल राज्य सरकारला घ्यावीच लागेल,मराठी भाषेचे विद्यापीठ अंबाजोगाईत व्हावे,या मागणीला बळ देणारा हा चरित्र ग्रंथ म्हणजे इतिहासाचा अनमोल ठेवा आहे असे गौरवोउद्गार उपप्राचार्य प्रा.भगवानराव शिंदे यांनी काढले.ते अंबाजोगाईत आद्यकवी मुकुंदराज स्वामी जीवन दर्शन चरित्र ग्रंथाच्या द्वितीय आवृत्तीच्या विमोचन प्रसंगी बोलत होते.

अंबाजोगाईतील प्रा.डॉ.शिवाजी यशवंतराव लोमटे यांनी आद्यकवी मुकुंदराज स्वामी जीवन दर्शन हा ग्रंथ लिहिला आहे. 1998 साली या ग्रंथाची पहिली आवृत्ती निघाली. अल्पावधीतच हा ग्रंथ संशोधकांसाठी मौलीक ठेवा बनला.नुकतेच या ग्रंथाची दुसरी आवृत्ती वाचकांच्या सातत्याच्या मागणीमुळे उपलब्ध करून देण्यात आली. या द्वितीय आवृत्तीचे विमोचन शहरातील हनुमान मंदिर, खडकपुरा येथे नुकतेच
करण्यात आले.ग्रंथ विमोचन सोहळ्यास मुकुंदराज देवस्थानचे अध्यक्ष किसन महाराज पवार,डॉ.भाऊसाहेब देशपांडे,ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड.अण्णासाहेब लोमटे,नगरसेवक डॉ.अतुल देशपांडे, सामाजिक कार्यकर्ते अनंतराव लोमटे, साहित्यीक उपप्राचार्य प्रा.भगवानराव शिंदे, रविंद्र लोमटे,रणजित लोमटे,अरूण मोरे, संभाजी देशमुख,कृष्णा भोसले व लेखक प्रा.डॉ.शिवाजी यशवंतराव लोमटे यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रंथाच्या द्वितीय आवृत्तीचे विमोचन करण्यात आले.यावेळी मुकुंदराज देवस्थानचे अध्यक्ष किसन महाराज पवार, डॉ.भाऊसाहेब देशपांडे, ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. अण्णासाहेब लोमटे, नगरसेवक डॉ.अतुल देशपांडे यांनी आपल्या मनोगतातून चरित्र ग्रंथ निर्मितीबद्दल लेखक प्रा.डॉ.शिवाजी लोमटे यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी चरित्र ग्रंथाचे लेखक प्रा.डॉ.शिवाजी लोमटे यांनी सांगितले की,सदर ग्रंथ हा थोडक्यात आणि महत्वाची परंतु,संपुर्ण माहिती देणारा चरित्र ग्रंथ आहे.असे चरित्र यापुर्वी आद्यकवी मुकुंदराज स्वामी यांचेवर कुठेच प्रसिद्ध झालेले नाही अशी माहिती दिली.सदर जीवनदर्शन ग्रंथात ह.भ.प.माधवबुवा शास्त्री महाराज यांचा आशिर्वादपर अभिप्राय लाभला आहे.मुकुंदराज यांची गुरू परंपरा,त्यांचे समकालीन संत, मुकुंदराज स्वामी समाधीचे महत्व,कथा, उत्सव,आरती, मुकुंदराजांनी लिहिलेले ग्रंथ,विवेक सिंधुचे (काही ओव्यांचे) रसग्रहण,बुट्टेनाथ व वाण संगम,संकलेश्वर मंदिर,गोदाकाठच्या नाथ व सिद्ध परंपरा,सार्थ परमामृत,अनन्यमत, पवन विजय यासह आरती श्री.गणपतीची, आरती विठ्ठल रूक्माई, मुकुंदराज आरती, तुकारामांची आरती, ज्ञानदेवांची आरती, प्रार्थना आदींचा समावेश व ऊहापोह सदर चरित्र ग्रंथात करण्यात आला आहे. तर ग्रंथात शेवटी संत ज्ञानेश्वर महाराज यांनी लिहिलेल्या पसायदान आहे.एकुण 86 पृष्ठे असलेल्या या ग्रंथाची अक्षरजुळवणी पंडीत कवचाळे यांनी करून राजदिप मल्टी सर्व्हीसेसने मुद्रक म्हणुन तर लेखक व प्रकाशक म्हणुन प्रा.डॉ.शिवाजीराव लोमटे यांनी अल्पावधीत अतिशय सुबक,आकर्षक स्वरूपात चरित्र ग्रंंथ निर्मिती केली आहे. चरित्र ग्रंथाच्या मुखपृष्ठावर आद्यकवी मुकुंदराज स्वामी समाधी परिसराची प्रतिमा तर ग्रंथात प्रथम आवृत्ती प्रकाशनाचे फोटो,कै.ह.भ.प. नागनाथ महाराज वरपगावकर (ता. केज.जि.बीड),संत ज्ञानेश्वर,संत रामदास यांच्या प्रतिमा समाविष्ट केल्या आहेत. अभ्यासक व संशोधनकांसाठी ‘आद्यकवी मुंकुंदाज स्वामी जीवन दर्शन’ हा चरित्र ग्रंथ अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.