अहमदनगर : नुकताच डॉ सुजय विखे-पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने नवीन राजकीय खेळी करीत लोकसभेसाठी विधान परिषदेचे आमदार अरुण जगताप यांचे नाव चर्चेत आणले आहे. आज रात्री मुंबईत आमदार जगताप पिता-पुत्रांची पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसमवेत चर्चा झाल्याचे समजते. त्यात आमदार जगताप यांना उमेदवारी देणार असे सांगण्यात आले आहे, अशी सूत्रांकडून माहिती आहे.
आमदार जगताप पिता-पुत्र मुंबईत दाखल झाले असून पक्षाचे राष्ट्रीय महासचिव प्रफुल्ल पटेल, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत त्यांची बैठक झाली आहे असे समजते. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीला प्रभावी उमेदवार मिळत नसल्याने पक्षाच्या नेत्यांकडून चाचपणी सुरू केली होती. विखे यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीचा नक्की कोण उमेदवार असेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. या चर्चेतच रात्री उशिरा राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार अरुण जगताप यांचे नाव पुढे आले आहे.