औरंगाबाद :आठवडा विशेष टीम―बेलखंडी मठाची जमीन प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते तथा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्य अडचणीत वाढ झाली आहे. धनंजय मुंडे यांच्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने गुन्हा दाखल करा,असे आदेश दिल्यानंतर अखेर आज दि.१४ ला त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सकाळी साडेसात वाजता अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर पोलीस ठाण्यात धनंजय मुंडे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेलखंडी मठाची जमीन हडप केल्याप्रकरणी धनंजय मुंडेंवर हा गुन्हा दाखल झाला आहे.
यात कलम ४२०, ४६८, ४६५, ४६४, ४७१ या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूण १४ आरोपींवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यात धनंजय मुंडे हे दहाव्या क्रमांकाचे आरोपी आहेत.धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
बेलखंडी मठाची जमीन हडपल्याचा आरोप धनंजय मुंडे यांच्यावर होता. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याबाबतची सुनावणी सुरु होती.“सरकारी जमीन बेलखंडी मठाला इनाम देण्यात आली होती. हीच जमीन धनंजय मुंडे यांनी पदाचा गैरवापर करुन त्यांच्या जगमित्र सहकारी साखर कारखान्यासाठी विकत घेतली. कृषी जमीनही अकृषिक केली.” असा आरोप याचिकाकर्ते राजाभाऊ फड यांनी केला होता.याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने धनंजय मुंडे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.
सविस्तर वृत्त असे की,बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई तालुक्यातील पूस या गावात जगमित्र सहकारी साखर कारखाना प्रस्तावित होता. हा साखर कारखाना सुरु करण्यासाठी धनंजय मुंडे यांनी २००६ ते २०१० या कालावधीत शेकडो एकर जमीन विकत घेतली त्याचबरोबर शेतकऱ्यांकडून तब्बल २५ कोटी रुपयांचं भांडवालही उभे केले होते. परंतु कारखाना काही सुरु झाला नाही.या प्रक्रियेत धनंजय मुंडे यांनी पूस या गावात असलेल्या बेलखंडी मठाची २५ एकर जमीनही विकत घेतली. ही जमीन बेलखंडी मठाला इनाम दिलेली जमीन होती आणि त्याचा विक्री व्यवहार होऊ शकत नव्हता याची माहिती असतानाही बेकायदेशीर पद्धतीने ही जमीन विकत घेण्यात आली आणि विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे अडचणीत सापडले.