बीड जिल्हयातील प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत स्वतंत्र वीज रोहित्र पोहोचविणार―ना.पंकजा मुंडे

‘एक शेतकरी एक रोहित्र’ योजनेच्या १८८ कोटीच्या कामाचा पांगरी, घाटनांदूर येथे थाटात शुभारंभ

परळी/अंबाजोगाई दि.१४:आठवडा विशेष टीम―राज्य शासनाने महावितरण च्या माध्यमातून उच्च दाब वितरण प्रणाली योजने (एचव्ही डीएस) अंतर्गत प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्यांना रोहित्र(डीपी) देण्याचा निर्णय घेतला असून बीड जिल्हयातील प्रत्येक शेतक-यांना पुढील काळात स्वतंत्र रोहित्र उपलब्ध करुन दिले जातील, यासाठी १८८ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे, असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास महिला आणि बाल विकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी येथे केले.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीने आयोजित ‘एक शेतकरी एक डीपी’ योजनेच्या जिल्ह्यातील कामाचा शुभारंभ परळी मतदारसंघातील पांगरी व घाटनांदूर येथे आज मोठ्या थाटात झाला, त्या प्रसंगी त्या बोलत होत्या. परळी तालुक्याच्या पांगरी गावातील विष्णू नागोराव पांचाळ तर घाटनांदूर येथे वैजनाथ गारठे या शेतकऱ्याच्या शेतात दहा केवी क्षमतेचा उच्चदाब रोहित्र बसविण्यात आला असून त्याचे उद्घाटन ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी आ. संगीता ठोंबरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सविता गोल्हार, महावितरणचे लातूर परिमंडळाचे मुख्य अभियंता रामदास कांबळे, अधीक्षक अभियंता संजय सरग, कार्यकारी अभियंता मंदार वैज्ञानिक, ए आर पाटील, अतिरिक्त कार्यकारी अभियंता थिटे, भाजपचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव गुट्टे, नेताजी देशमुख, नामदेवराव आघाव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलतांना ना पंकजाताई मुंडे म्हणाल्या, महावितरणच्या या अनोख्या योजनेमुळे वीजगळती कमी होणार असून वीज चोरी देखील रोखली जाईल. या योजनेतून एका रोहित्रा मधून एक अथवा जास्तीत जास्त दोन शेतकऱ्यांना वीज जोडणी दिली जाईल .पूर्वी एकाच रोहित्रा वर अनेक लाभार्थी शेतकऱ्यांच्या वीज जोडण्या असल्यामुळे वारंवार वीज खंडित होणे, अतिरिक्त वीज देयक प्राप्त होणे याबाबत तक्रारी प्राप्त व्हायचा परंतु या नवीन योजनेमुळे जितका वापर तितके देयक शेतकऱ्याला भरावे लागेल. याच बरोबर शासनाने शेतकऱ्यांसाठी सौर पंप योजना , महावितरण आपल्या दारी ही योजना देखील राबवली याचा फायदा शेतकऱ्यांना झाला आहे यापूर्वी मागणी नोंदविलेल्या शेतकऱ्यांना देखील या नव्या योजनेत समाविष्ट घेण्यासाठी करून घेण्यासाठी शासनस्तरावरुन आवश्यक ते निर्देश देण्याबाबत कार्यवाही करू.

शेवटच्या घटकांपर्यंत विकास

समाजातील शेवटच्या माणसापर्यंत, शेतकरी, शेतमजूर यांच्यापर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी केंद्र व राज्य शासन काम करीत आहे. यामुळेच या योजनेतून शेतकऱ्यांना विनाखर्च त्याचा शेतापर्यंत वीज रोहित्र बसविले जात आहेत. यासाठी महावितरण कंपनीला शासनाने उद्दिष्ट आखून दिले असून यासाठी निधी देखील उपलब्ध करून दिला असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी लाभार्थी शेतकरी विष्णू पांचाळ व वैजनाथ गारठे यांचा यावेळी ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला.

आता आपले कनेक्शन… जसे थेट रोहित्र तसे थेट नेतृत्व

दरम्यान या समारंभात बोलताना ना. पंकजाताई मुंडे यांनी लोकसभा निवडणुकीत खा. डाॅ. प्रीतमताई मुंडे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी केल्याबद्दल जनतेचे आभार मानले. तसेच शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती निर्माण करण्यासाठी आपले अविरतपणे प्रयत्न असून आज ‘एक शेतकरी एक रोहित्र ‘ योजनेच्या माध्यमातून प्रत्येकाला जसे थेट कनेक्शन मिळाले तसेच यापुढे नेतृत्वाशी ही तुमचे थेट कनेक्शन राहील असा विश्वास व्यक्त केला.

कार्यक्रमाचे संचलन राम कुलकर्णी यांनी केले. इलेक्ट्रोपाथ सर्व्हिसेसचे संभाजी गिते यांनी ना. पंकजाताई मुंडे यांचा सत्कार करून आभार मानले.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.