महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान राजगृहाचे राष्ट्रीय स्मारक करावे―रामदास आठवले

मुंबई दि.१४:आठवडा विशेष टीम―महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे दादर पूर्वेतील ऐतिहासिक ठरलेल्या राजगृह या निवासस्थानाचे राष्ट्रीय स्मारक करावे तसेच या राजगृहात राहणाऱ्या आंबेडकर कुटुंबियांचे आणि राजगृहातील भाडेकरूंचे योग्य पुनर्वसन शासनाने करावे अशी मागणी केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लीकन पक्षाच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. मुख्यमंत्र्यांना त्यांच्या वर्षा निवासस्थानी आज भेटलेल्या रिपाइंच्या शिष्टमंडळात राष्ट्रीय अध्यक्ष ना रामदास आठवले; प्रवक्ते अविनाश महातेकर ; गौतम सोनवणे; काकासाहेब खंबाळकर ; एम एस नंदा आदी मान्यवर उपस्थित होते.

दादर पूर्वेतील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या राजगृहाचे राष्ट्रीय स्मारक करण्यास महाराष्ट्र शासनाची तत्वतः मान्यता असून त्या आधी राजगृहातील आंबेडकर कुटुंबीय आणि भाडेकरूंचे योग्य पुनर्वसन करणार असल्याचे आश्वासन रिपाइं ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे अशी माहिती ना. रामदास आठवले यांनी दिली.

इंदूमिलस्थळी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे काम वेगवान गतीने करावे तसेच या स्मारकात उभारण्यात येणारा महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा चबूतऱ्याची उंची वगळून 350 फूट ऊंच उभारण्यात यावा म्हणजे पुतळ्याची एकूण उंची 500 फुटांपेक्षा अधिक होईल. या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली असल्याची माहिती ना. रामदास आठवले यांनी दिली आहे.

राज्य सरकारच्या होत असलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात आणि महामंडळांमध्ये रिपब्लिकन पक्षाला संधी देण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे यावेळी केली असल्याची माहिती ना. रामदास आठवले यांनी दिली आहे.

राजगृहाचे राष्ट्रीय स्मारक करावे ही आंबेडकरी जनतेची जुनी आणि महत्वाची मागणी असल्याची माहिती या यावेळी शिष्टमंडळात उपस्थित असलेले रिपाइं चे राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर यांनी दिली.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.