अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हामहाराष्ट्र राज्य

स्वच्छ सर्वेक्षण- २०१९ मध्ये अंबाजोगाई नगर परिषदेला राष्ट्रीय पुरस्कार

अंबाजोगाई (प्रतिनिधी) : अंबाजोागई नगर परिषदेला केंद्र सरकारच्या वतीने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत राबविण्यात येणार्‍या स्वच्छ सर्वेक्षण-२०१९ चा राष्ट्रीयस्तरावरील पुरस्कार जाहिर झाला आहे.बुधवार,दि.६ मार्च रोजी विज्ञान भवन,नवी दिल्ली येथे देशाचे मा.राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार असल्याचे पत्र नगरपरिषदेस नुकतेच प्राप्त झाले आहे.

अंबाजोगाई नगर परिषदेने शहरातील कचर्‍याचे विलगीकरण, संकलण व ओल्याकचर्‍यावर प्रक्रिया करण्याचे अनेक प्रकल्प गेल्या ६ ते ७ महिन्यांपासुन हाती घेतले असून विविध स्तरावर त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. शहरातील निर्माण होणार्‍या दैनंदिन १२ टन कचर्‍याचे वर्गीकरण व संकलन योग्य पद्धतीने करून त्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे.यामध्ये घर स्तरावर ओल्या कचर्‍यापासुन गांडुळ खत निर्मीत करण्यास नागरिकांना प्रोत्साहित केल्याने अनेक नागरिकांनी स्वतः गांडुळ खत निर्मितीस सुरूवात केली आहे. तसेच वॉर्ड स्तरावर १० ठिकाणी स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने गांडुळखत निर्मिती प्रकल्प नगरपरिषदेने सुरू केले आहेत. त्यामुळे त्या-त्या वॉर्डात निर्माण होणार्‍या ओल्या कचर्‍यावर त्याच वॉर्डात प्रक्रिया केली जात आहे.
स्वच्छ भारत अभियानाच्या निधीतून शास्त्रोक्त पद्धतीने कचरा प्रक्रिया केंद्र नगर परिषदेने मांडवा रोड सर्वे नं.१७ मध्ये विकसित केलेले आहे. नगर परिषदेमध्ये जुलै २०१८ मध्ये मुख्याधिकारी म्हणून डॉ.सुधाकर जगताप हे आल्यानंतर त्यांनी नगर परिषदेचे पदाधिकारी, अधिकारी,कर्मचारी, स्वच्छता निरिक्षक व सफाई कर्मचारी या सर्वांच्या सहकार्याने टिमवर्कने काम करून अल्पावधीत नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापनात उल्लेखनिय प्रगती केली आहे.तसेच माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्या सातत्यपुर्ण पाठपुराव्यामुळे शासनाकडून नगरपालिकेस मोठ्या प्रमाणावर विकास निधी मिळाला आहे.त्यामुळे अंबाजोगाईत विविध विकास कामे ही प्रगतीपथावर आहेत.
याच विकास निधीतून शहरातील जिर्ण झालेली शौचालय दुरूस्त करून आवश्यक त्या ठिकाणी नविन शौचालयांची निर्मिती करून नागरिकांची सोय केली आहे.तसेच शहरात ३३०० वैयक्तीक शौचालयांची निर्मिती करून नगर परिषद अंबाजोगाई ही औरंगाबाद विभागात अग्रेसर ठरली आहे.या सर्व बाबी एकजुटीने व सर्व घटकांचे सहकार्याने राबविल्याबद्दल नगराध्यक्षा सौ.रचनाताई सुरेश मोदी,उपनगराध्यक्ष सारंग पुजारी,माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी,मुख्याधिकारी डॉ.सुधाकर जगताप, स्वच्छता निरिक्षक अनंत वेडे,नोडल ऑफिसर अजय कस्तुरे व सर्व टिमचे अनेक स्तरांतून अभिनंदन होत आहे. मराठवाड्यातील केवळ ३ नगर पालिकांचीच केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानातर्गंत स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत निवड झाली आहे. अंबाजोगाई पालिकेची निवड स्वच्छ सर्वेक्षण या मुख्य स्पर्धेत तर परळी वैजनाथ व वैजापुर या नगर पालिकांची कचरामुक्त शहरसाठी निवड झाली आहे.या स्पर्धेत एकुण ४३२४ नगरपरिषदा सहभागी झाल्या.त्यात मराठवाड्यातील ७८ यांनी सहभाग घेतला. त्यापैकी अंबाजोगाई, परळी व वैजापुर यांची निवड झाली आहे. गतवर्षी २०५ व्या रँकवर असलेल्या अंबाजोगाई नगर पालिकेने यावर्षी थेट राष्ट्रीय पुरस्कारालाच गवसणी घातली आहे. यापुर्वी ही नगरपरिषदेला संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानातर्गंत राज्यात,विभागात व जिल्हास्तरावर सर्व प्रथम, द्वितीय क्रमांकाची पारितोषिके मिळालेली आहेत.
याच उपक्रमाचा एक भाग म्हणून रविवार,दि. ३ मार्च रोजी डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाण रेवदंडा (ता.अलिबाग) यांच्या सौजन्याने व पद्मश्री डॉ.अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ६.३० वाजता श्री.छत्रपती शिवाजी महाराज चौक अंबाजोगाई येथून भव्य महास्वच्छता अभियानाला सुरूवात होणार आहे.ही स्वच्छता मोहिम स्वच्छ भारत अभियानाचे मा.राज्यपाल यांनी नियुक्त केलेले स्वच्छता दुत पद्मश्री डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी तसेच सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली व नगरपरिषदेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे.या अभियानासाठी सोलापुर,पंढरपुर, उस्मानाबाद व लातुर परिसरातून सुमारे १५ हजार श्रीसदस्य हे स्वच्छतेसाठी अंबाजोगाई शहरात येणार आहेत.जमा केलेला कचरा हा नगर परिषदेच्या व खासगी वाहनातुन उचलला जाणार आहे व डंपींग ग्राउंडपर्यंत पोहोंचवला जाणार आहे.या अभियानात अंबाजोगाईतील विविध स्वयंसेवी संस्था,शिक्षण संस्था,रोटरी क्लब, बचतगट,एन.एस.एसचे स्वयंसेवक,एन.सी.सीचे छात्र,सामाजिक संघटना,बँका, पतसंस्था,मंडळे यांचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत. हे अभियान सर्व शहरात राबविले जाणार आहे. नगर परिषदेच्या वतीने १५० ट्रॅक्टर,जेसीबी, टिप्पर पुरविण्यात येणार आहेत.तरी सर्व अंबाजोगाईकर
नागरिकांनी या अभियानात सहभागी व्हावे व अंबाजोगाई शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी आपला अमुल्य सहभाग नोंदवावा असे आवाहन नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button