अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― भारतीय लोकशाही व राज्यघटना अबाधित ठेवण्यासाठी व संविधानाचे रक्षण करण्यासाठी बॅलेट पेपरच्या माध्यमातून मतदान करणे हाच एकनेव पर्याय व उपाय असून लोकशाहीला मारक ठरणार्या ई.व्ही.एम.मशीन बंद करून मतपत्रिकेद्वारे निवडणूका घेण्यात याव्यात या मागणीसाठी मंगळवार,दि.25 जून रोजी अंबाजोगाईत आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते बन्सीअण्णा जोगदंड यांनी केले.
शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक नामफलकाला पुष्पहार अर्पण व अभिवादन करून सदर आक्रोश मोर्चा सावरकर चौक, शिवाजी चौक मार्गे उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. सहभागी मोर्चेकर्यांनी “ई.व्ह.एम.हटाव देश बचाव”च्या घोषणा दिल्या.यावेळी मोर्चेकर्यांनी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांना निवेदन दिले.दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,ई.व्ही. एम.मशीन बंद करून बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात यावे.ई.व्ही. एम.मशीनच्या निषेधार्थ हा मोर्चा काढला असल्याचे सांगण्यात आले.निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते बन्सीअण्णा जोगदंड, वंचित बहुजन आघाडीचे बीड लोकसभेचे उमेदवार प्रा.विष्णु जाधव, संतरामभाऊ पारवे, शेकापचे हनुमंत गायकवाड,जनता दलाचे जिल्हाध्यक्ष वाजेद खतीब,अॅड. सुभाष जाधव,रामभाऊ सावंत,महादेव वाव्हळे, समाधान काळुंके, विलास सरवदे,कल्याण उदार,रतन शिंगाडे, के.टी.जाधव,ज्ञानेश्वर कवठेकर आदींसहीत असंख्य कार्यकर्ते, पुरोगामी चळवळीत काम करणारे विविध पक्ष,संघटना,वंचित समाज घटकातील युवक,नागरिक सहभागी झाले.यावेळी अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
ई.व्ही.एम.च्या माध्यमातून घटना बदलाचे षडयंत्र- बन्सीअण्णा जोगदंड
राज्यात व देशात सत्ताधारी व विरोधी पक्ष कुणाला म्हणावे असा प्रश्न जनतेला पडला आहे.सत्ताधार्यांना लोकशाही संपवुन देशात हुकुमशाही आणायची आहे. जनतेच्या प्रश्नावर आमदार,खासदार बोलत नाहीत.केवळ पंतप्रधानच बोलतात. घटना बदलली की, लोकशाही संपुष्टात येणार आहे. दिवसेंदिवस सामान्य माणसावर अन्याय अत्याचार वाढत आहेत. ई.व्ही.एम.च्या माध्यमातून सत्तेवर आलेले विद्यमान सरकार हे संविधान विरोधी आहे त्यामुळे पुढील निवडणूका ई.व्ही.एम.ऐवजी बॅलेट पेपरवर व्हाव्यात.
ई.व्ही.एम.विरोधात अॅड.प्रकाश आंबेडकर न्यायालयात दाद मागणार-प्रा.विष्णु जाधव
भारतीय लोकशाही संपुष्ठात आणण्यासाठी ई.व्ही.एम.चा वापर करून सत्तेत आलेले भाजपा सरकार हे संविधान बदलण्यासाठी प्रयत्न करत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत देशात व राज्यात झालेले मतदान व मतदान यंत्रातून जाहिर केलेले मतदानाची आकडेवारी यात मोठी तफावत आहे.देशातील 278 लोकसभा मतदार संघात ई.व्ही.एम. मशीनमध्ये केलेल्या घोळामुळे मतदानाची आकडेवारी जुळत नाही.त्याला विरोध करण्यासाठी श्रद्धेय अॅड.प्रकाश आंबेडकर यांचे नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीचे सर्व लोकसभा उमेदवार यांनी न्यायालयाचे दार ठोठावले आहे.आगामी निवडणूका या मतपत्रिकेद्वारे घेण्यात याव्यात अन्यथा संपुर्ण निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार घालण्याची भूमिका घेण्यात येईल.