मुलांच्या हृदयाची काळजी घेणारे श्री सत्य साई संजीवनी केंद्र प्रत्येक जिल्ह्यात आवश्यक

Last Updated by संपादक

आठवडा विशेष टीम―

नवी मुंबई, दि. 07 :- मुलांच्या वेदनांपेक्षा जास्त वेदना पालकांना सहन कराव्या लागतात. ही स्थिती असलेल्या मुलांची काळजी घेणारी केंद्रे देशात फार कमी आहेत. मुलांच्या हृदयाची काळजी घेण्यासाठी श्री सत्य साई संजीवनी केंद्रासारख्या संस्था प्रत्येक जिल्ह्यात आवश्यक आहेत. रोगांचे लवकर निदान झाल्यास मृत्यू टाळता येऊ शकतो असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.

नवी मुंबईतील खारघर येथे श्री सत्य साई संजीवनी सेंटर फॉर चाइल्ड हार्ट केअर अँड ट्रेनिंग इन पेडियाट्रिक कार्डियाक स्किल्सचा 5 वा वर्धापन दिन सोहळा राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी श्री सत्य साई संजीवनी सेंटर फॉर चाइल्ड हार्ट केअरचे अध्यक्ष डॉ. सी. श्रीनिवास, पूज्य सद्गुरु मधुसूदन साई पदव्युत्तर संस्था रोहतकच्या कुलगुरू अनिता सक्सेना, प्र-कुलगुरू कृष्णा डॉ.विद्यापीठ, कराडचे डॉ.प्रवीण शिनगारे, कोंकण विभागाचे विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर, रायगडचे जिल्हाधिकारी  डॉ. योगेश म्हसे, पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख, आदी उपस्थित होते.

आजपर्यंत हजारो बालकांवर या रुग्णालयात मोफत उपचार करण्यात आले असून त्यांचे नवीन आयुष्य सुरू झाले असल्याचे सांगून राज्यपाल रमेश बैस म्हणाले की, आजारी हृदयाला बरे करण्यासाठी आपल्याला चांगल्या हृदयाची गरज आहे आणि रुग्णांना आनंदी ठेवण्यासाठी आपल्याला निरोगी मनाची गरज आहे. जन्मजात हृदयरोग ही एक गंभीर समस्या आहे. भारतात जन्मजात हृदयविकाराने जन्मलेल्या मुलांची अंदाजे संख्या दरवर्षी दोन लाखांपेक्षा जास्त आहे. म्हणूनच या आजाराबाबत जनजागृती करणे सर्वात महत्त्वाचे आहे. रोगाचे निदान आणि उपचार यावर लक्ष केंद्रित करून प्रतिबंध हे आमचे प्राथमिक ध्येय असले पाहिजे. गर्भवती मातांनी गर्भधारणेदरम्यान निरोगी जीवनशैलीचे महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे.

cb3b8c21 10ec 4d94 8ed7 b6f6be5800ac

जिल्हास्तरीय रुग्णालयांमध्ये रोगाचे निदान शोधून त्यावर उपचार करण्याच्या सुविधाही वाढवायला हव्यात. या रुग्णालयांमध्ये आवश्यक पायाभूत सुविधा, वैद्यकीय तज्ञ आणि प्रगत उपकरणे पुरवली जावीत. असे केल्याने, आम्ही मोठ्या रुग्णालयांवरील भार लक्षणीयरीत्या कमी करू आणि वेळेवर हस्तक्षेप करण्यास सक्षम होऊ, ज्यामुळे मौल्यवान जीव वाचवू शकू. वैद्यकीय क्षेत्रातील संशोधन हे अत्यंत महत्त्वाचे असून या उपक्रमाला शासनाचा नेहमीच पाठिंबा असतो. श्री सत्य साई संजीवनी रिसर्च फाउंडेशन जन्मजात हृदयविकारावर संशोधन करत असल्याचे पाहून आनंद व्यक्त करत संस्थेशी संबंधित शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांचे त्यांच्या संशोधन कार्याबद्दल अभिनंदन करुन यावेळी राज्यपाल महोदयांनी  शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या प्रारंभी रुग्णालयात हृदयाची शस्त्रक्रिया झालेल्या बाल रुग्णांना गिफ्ट ऑफ लॉईफ प्रमाणपत्र   राज्यपालांच्या हस्ते  देण्यात आले. यावेळी श्री सत्य साई संजीवनी सेंटरचे अध्यक्ष डॉ. सी. श्रीनिवास, पूज्य सद्गुरु मधुसूदन यांची समोयोचित भाषणे झाली.

000

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.