घराणेशाही,भांडवलशाहीच्या विरोधात आष्टी पाटोदा शिरूर मधून चांगदेव गिते विधानसभा लढविणार

पाटोदा:आठवडा विशेष टीम―काहींना यात फार फालतुगिरी वाटत असेल, काहींना गांभीर्य, तर काहींना निव्वळ टाईमपास …,
पण मित्रांनो भारतात लोकशाही आहे पण जरा बारीक विचार केला तर ही लोकशाही फक्त काही शाही लोकांच्या हातात गेली आहे नव्हे आपणच दिली आहे.
दुसऱ्या, तिसऱ्या पिढीत फक्त ठराविक घरातच देशाची अन राज्याची सत्ता आहे. खात्री नसेल तर आढावा घेऊन पहा राज्यातल्या २८८विधानसभा अन देशातल्या ५४५लोकसभे पैकी जवळपास ८० टक्के जागेवर घराणेशाही घट्ट पाय रोवून आहे, असे अनेक मुद्दे आहेत.

मुळात वाईट याचं वाटतं की सामान्य माणसांच्या हातात ह्या सगळ्या गोष्टी असताना शिवाय गुप्त मतदान पद्धती असताना आपण जर फक्त पैश्यावाले, राजकीय वारसा असणारे, गुंड, धर्मांध लोकं निवडुन देत असु तर त्यांच्या पेक्षा आपणच जास्त नालायक आहोत असं माझं ठाम मत आहे.

आज सामान्य माणसाने निवडणूकीचा विचार केला तरी सामान्यच लोकं हसायला लागतात. आज घडीला साध्या ग्रामपंचायतच्या निवडणुकिचा खर्च सामान्य माणसाला भोवळ येईल इतका आहे.

अन अशात आमच्या सारखा एखादा फाटका जर म्हटला निवडणुक लढवायची आहे तर सामान्य लोकंच टर उडवायला लागतात. अजुन दहा-पाच वर्षाने तर सामान्य माणुस निवडणुकीचा विचार देखील करू शकणार नाही.

खरं तर आपल्यातला एखादा सामान्य माणुस जर उभा असेल किंवा तसा विचार करत असेल तर आपण सगळ्यांनी त्याला बळ द्यायला(च) पाहिजे.
कारण आपल्या समस्या धन-दांडग्या पेक्षा आपल्यातील माणसालाच जास्त माहीत असतात, शिवाय अजुन किती दिवस आपण त्यांच्याच चपला उचलायच्या ??

बरं !! आपण जे निवडुन देतो त्यातले अनेक लोकं हे भ्रष्टाचारी, गुंड, मवाली प्रवृत्तीचे शिवाय अक्कलशुन्य ही असतात.

बाकी विशेष म्हणजे सव्वाशे कोटीच्या देशात अजुन कोणाला लोकप्रतिनिधी व्हावं वाटत नाही का ?
आपल्यातले कोणी त्या पात्रतेचे नाहीत का ?
खरंच आपल्या देशातली लोकशाही सुदृढ होतेय का ?
असे अनेक प्रश्न अनुत्तरित राहतात.

मित्रांनो राहीला प्रश्न माझ्या निवडणूक लढण्याचा तर मी एक सामान्य माणुस आहे. फक्त एका जीवघेण्या अपघातातून वाचलो असल्याने मला आयुष्याची किंमत कळाली आहे पण त्याबरोबर जगण्या-मरण्याची भिती ही अजिबात उरली नाही.

आज सामान्य माणुस साध्या नगरसेवका विरुद्ध सुद्धा आवाज उठवु शकत नाही ?? विश्वास नसेल तर एखाद्याला काही विचारून बघा, राजकारणातली गुंडशाही कळेल तुम्हाला !!

त्या परिस्थितीत मी राज्यातल्या अनेक मंत्री, आमदार, खासदार, अधिकारी यांना अनेकवेळा प्रत्यक्ष जाब विचारला आहे.
इतर अनेक प्रश्नांवर जीव धोक्यात घालुन आवाज उठवला आहे.
अन अश्या वातावरणात कोणा विरुद्ध निवडणुक लढवणे किंवा तसा विचार करणे ही साधी गोष्ट नाही.

निवडुन येण्याचा, माघार घेण्याचा किंवा पडण्याचा विषय नाही पण घर जळत असताना मी गप्प नाही ही पण छोटी गोष्ट नाही.
काही गोष्टी चुकत असतील यात शंका नाही पण डोळ्यासमोर काही घडत असताना गप्प बसणं हे ही उचित नाही.

अनेक गोष्टीत मी सकारात्मक विचार करत असल्याने बऱ्याच लोकांना या गोष्टी पटत असतील अशी आशा करतो. शेवटी खिल्ली उडवणे, मजाक उडवणे सोपी गोष्ट आहे पण प्रत्यक्ष मैदानात सामना करणं अवघड असतं !!
असे त्यांनी प्रसिद्धीपत्रकात दिले आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.