परळी तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युजविशेष बातमीसामाजिक

बीड: ना.पंकजाताई मुंडे यांची अश्वारूढ मिरवणूक ; परळीत मराठा बांधवांचा ऋणनिर्देश सोहळा उत्साहात

जातीपातीचे राजकारण झुगारून द्या ; विकास हिच जात - ना.पंकजाताई मुंडे

परळी दि.११:आठवडा विशेष टीम―बीड जिल्हयात ज्यांनी ज्यांनी जातीपातीचे राजकारण केले, ते आज नेस्तनाबूत झाले आहेत, त्यामुळे अशा राजकारणाला थारा देऊ नका, विकास हिच जात मी मानते, त्यामुळेच कोट्यवधी रुपयांचा निधी जिल्हयात आणू शकले, भविष्यात विकासाच्याच मागे उभे रहा असे सांगत राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी समाजातील वंचित घटकांना न्याय देण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार असल्याचे सांगितले.

मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण दिल्याबद्दल मतदारसंघातील मराठा समाज बांधवांनी आज ना. पंकजाताई मुंडे यांचा भव्य ऋणनिर्देश सोहळा आयोजित केला होता, त्यावेळी सत्काराला उत्तर देताना त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. आर. टी. देशमुख होते. पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, मराठा समाजाची आरक्षणाची लढाई गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होती, काॅग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्तेच्या काळात प्रमुख पदांवर समाजाचे नेते विराजमान होते, समाजाच्या जीवावर त्यांनी अनेक राजकीय पदं उपभोगली परंतु त्यांच्या मागणीकडे मात्र साफ दुर्लक्ष केले, म्हणूनच समाजाची पिछेहाट झाली व इतके वर्षे आरक्षणासाठी संघर्ष करावा लागला. तत्कालीन सत्ताधा-यांनी ही मागणी संवेदनशीलपणे हाताळली नसल्याने सनदशीर मार्गाने समाजाने आंदोलन केले, त्यांची ही मागणी मान्य करत भाजप सरकारने कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण मिळवून दिले आणि त्यांना खरा न्याय मिळाला असे त्या म्हणाल्या.

वंचितांसाठी लढणार

आरक्षणाच्या लढाईत लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब अग्रभागी होते, मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी ते नेहमीच आग्रही होते, सत्तेत आल्यास आम्हीच ते देऊ असे ते म्हणाले होते याची आठवण ना. पंकजाताई मुंडे यांनी करून दिली. मुंडे साहेबांनी माझ्यावर अनेक जबाबदा-या सोपवल्या, त्या पूर्ण करण्याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज व जिजाऊंमुळे आपणांस मिळते असे त्या म्हणाल्या. समाजातील वंचितांसाठी लढा देण्याची त्यांची शिकवण असल्याने शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्यासाठी लढणार आहे. लोकसभा निवडणुकीत जिल्हयात जातीपातीचे राजकारण मोठ्या प्रमाणात झाले, ज्यांनी ज्यांनी हे केले त्यांना जनतेने जागा दाखवली, आज ते पाताळात गेले आहेत. भविष्यात जातीचे नाही तर विकासाचे राजकारण मी करणार आहे, जनतेचा विकास हिच जात मी मानते असे त्या म्हणाल्या.

माझं राजकारण भावनेचं नाही तर भावनेनं

माझं राजकारण हे भावनेचं नाही तर मी भावनेनं राजकारण करते. जो माणूस भावनाशुन्य राजकारण करतो, गोरगरिबांच्या जमिनी लाटतो त्याला कोणत्याही पदांवर राहण्याचा नैतिक अधिकार नाही अशा शब्दांत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला. माझी लढाई कोण्या विशिष्ट व्यक्तीविरूध्द नाही तर प्रवृत्ती विरूध्द आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. मी कोणत्या पदांच्या लालसेने राजकारणात आले नाही, तुम्हाला आज योग्य दिशा व विकास देणारा माणूस हवा आहे, अशा माणसांच्याच पाठिशी खंबीरपणे उभा रहा असे सांगून मराठा समाजाला आपण परळी येथे झालेल्या आंदोलनाच्या वेळी जो शब्द दिला होता तो पूर्ण केला असल्याचे त्या म्हणाल्या.

निवड चांगले-वाईट अशी करा- देशमुख, सोळंके

जनतेने कुठलाही नेता निवडताना मराठा-बहूजन अशी करू नये तर चांगला, वाईट किंवा सोज्वळ, क्रुर अशी करावी तरच सर्व घटकांना न्याय मिळतो अशा शब्दांत भाजपचे प्रदेश चिटणीस राजेश देशमुख व शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख वैजनाथ सोळंके यांनी मनोगत व्यक्त केले तर पंकजाताई जे बोलतात तेच करतात असे शिवसेनेचे तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे यावेळी म्हणाले.

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधाकर पौळ यांनी केले तर संचलन वेडे सर व जोगदंड यांनी केले. यावेळी आ. आर. टी. देशमुख, सचिन सोळंके यांनीही आपले विचार मांडताना ना. पंकजाताई मुंडे यांचे आभार मानले. याप्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष नेताजी देशमुख, वृक्षराज निर्मळ, नारायण सातपुते, दत्ता देशमुख, बालासाहेब कराळे, सुरेश माने, प्रल्हाद सुरवसे, भाऊसाहेब घोडके, जीवनराव किर्दंत, विलास जगताप, संजय गिराम, शामराव आपेट, बाबा शिंदे, प्रभाकर कदम, भरत सोनवणे, मोहनराव आचार्य, आश्रुबा काळे, धनंजय कराळे, पंडितराव मुठाळ, आबासाहेब मोकाशे, रमेश पाटील, रमेश भोयटे, भाऊराव भोयटे, केदार देशमुख, बालाजी सातपुते आदींसह मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

क्षणचित्रं

• ऋणनिर्देश सोहळ्यापूर्वी शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मोटरसायकल रॅलीस सुरवात, हजारो युवा कार्यकर्ते रॅलीत सहभागी

• शिवाजी चौक, बस स्थानक, एकमिनार चौक, स्टेशन रोड, मोंढा विभाग, राणी लक्ष्मीबाई टाॅवर मार्गे रॅली जिजामाता उद्यान येथे आल्यानंतर उद्यानातील राष्ट्रमाता जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला, त्या अगोदर रेल्वे स्टेशन परिसरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण.

• पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांची समाज बांधवांनी नटराज रंगमंदिरा पर्यंत घोड्यावरून मिरवणूक काढली, यावेळी त्यांच्या हातात तलवारही दिली, यावेळी झाशीची राणी अवतरल्याचा भास झाला. वाजत गाजत, फटाक्यांच्या आतिषबाजीत जोरदार स्वागत, कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह व जल्लोष पहायला मिळाला.

• कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी मराठा आरक्षणासाठी बलिदान देणा-या हुतात्म्यांना दोन मिनीटं स्तब्ध उभा राहून उपस्थितांनी श्रध्दांजली अर्पण केली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ, लोकनेते मुंडे साहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन

• नाणेकर सरांच्या जिजाऊ वंदनाने मुख्य कार्यक्रमाला प्रारंभ. ना. पंकजाताई मुंडे यांचा शाल, श्रीफळ, फेटा बांधून व शिवरायांची भव्य प्रतिमा व तलवार देऊन सत्कार करण्यात आला.

• जागृती पतसंस्था, शिवक्रांती सेना, छत्रपती संभाजी राजे मित्रमंडळ, प्राध्यापक व शिक्षक संघटना, मराठा सेवा संघ आदी विविध संस्थांच्या वतीने ना. पंकजाताई मुंडे यांचे भव्य स्वागत झाले.

• ऋणनिर्देश सोहळ्यासाठी नटराज रंगमंदिरात मराठा बांधवांची खचाखच गर्दी, जागा अपुरी पडल्याने बाहेर टाकलेल्या मोठ्या मंडपात बसून समाज बांधवांनी मोठ्या स्क्रीनवर कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.

बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.