अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― अंबाजोगाई तालुक्यातील चनईतांडा व दगडुतांडा या दोन ठिकाणी अवैधरित्या मद्यनिर्मिती होत असल्याची माहिती प्राप्त होताच शुक्रवार, दि.12 जुलै रोजी दुपारी सव्वा बारा ते पावणे दोनच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क, अंबाजोगाई विभाग निरीक्षकांच्या पथकाने धाड टाकून 1 लाख 32 हजार 900 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून त्यातील काही जागेवरच नष्ट करण्यात आला असल्याची माहीती प्रभारी निरीक्षक अनिल गायकवाड यांनी दिली.
बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी अवैध हातभट्टी केंद्रांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून सातत्याने धाडी टाकण्यात येत आहेत.आता पर्यंत 17 ते 18 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.त्यापैकी काही जागेवरच नष्ट केला. तसेच अनेकांवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.राज्य उत्पादन शुल्क अंबाजोगाई विभागाअंतर्गत वडवणी,केज, माजलगाव,धारूर, परळी,अंबाजोगाई हे सहा तालुके येतात त्यामुळे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांचे सुचनेनुसार व राज्य उत्पादन शुल्क बीडचे अधिक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने अवैध दारू निर्मिती,विक्री,हातभट्टी केंद्रांवर कारवाई करण्यात येत आहे.याच कारवाई अंतर्गत चनईतांडा व दगडुतांडा या दोन ठिकाणी अवैध मद्यनिर्मिती केंद्रांवर धाडी टाकून 2 गुन्हे नोंदवले.सदर ठिकाणी आरोपी मिळून आले नाहीत.महाराष्ट्र दारू बंदी कायदा 1949 अंतर्गत दोन्ही ठिकाणी बेवारस दोन गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.टाकलेल्या धाडीत चनईतांडा व दगडुतांडा येथे बेवारस स्थितीत 5 हजार 975 लिटर रसायन,15 लिटर तयार हातभट्टी दारू,1 सिंटेक्स टाकी (500 लीटर),27 बॅरल (200 लिटर),पाच डब्बे,चार टोपली,दोन चाटु असा एकूण 1 लाख 32 हजार 900 रूपये (एक लाख बत्तीस हजार नऊशे रुपये) किंमतीचा मुद्देमाल जप्त करून त्यातील काही जागेवरच नष्ट करण्यात आला.या दोन्ही ठिकाणी झालेल्या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क, अंबाजोगाई विभागाचे प्रभारी निरीक्षक अनिल गायकवाड,जवान बि.के.पाटील,जवान आर.ए.जारवाल, वाहनचालक के.एन.डुकरे यांनी सहभाग घेतला.