बीड: बुट्टेनाथ दरीत अवैध मद्यनिर्मिती केंद्रावर धाड ; सलग दुस-या दिवशी मोठी कारवाई ;2 लाख 59 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―सलग दुसऱ्या दिवशी अंबाजोगाई लगतच्या अत्यंत दुर्गम व अडचणीच्या ठिकाणी बुट्टेनाथ दरी येथे अवैधरित्या मद्यनिर्मिती होत असल्याची माहिती प्राप्त होताच शनिवार, दि.13 जुलै रोजी सकाळी सात ते साडे आकराच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क, अंबाजोगाई विभाग निरीक्षकांच्या पथकाने धाड टाकून 2 लाख 59 हजार 650/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून त्यातील काही जागेवरच नष्ट करण्यात आला असल्याची माहीती प्रभारी निरीक्षक अनिल गायकवाड यांनी दिली.

बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी अवैध हातभट्टी केंद्रांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून सातत्याने धाडी टाकण्यात येत आहेत.आता पर्यंत 21 लाख 93 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यापैकी काही जागेवरच नष्ट केला.तसेच अनेकांवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.राज्य उत्पादन शुल्क अंबाजोगाई विभागाअंतर्गत वडवणी,केज, माजलगाव,धारूर, परळी,अंबाजोगाई हे सहा तालुके येतात त्यामुळे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांचे सुचनेनुसार व राज्य उत्पादन शुल्क बीडचे अधिक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने अवैध दारू निर्मिती,विक्री,हातभट्टी केंद्रांवर कारवाई करण्यात येत आहे.याच कारवाई अंतर्गत सलग दुस-या दिवशी अत्यंत दुर्गम व गर्द झाडीने वेढलेल्या बुट्टेनाथ दरी या ठिकाणी अवैध मद्यनिर्मिती केंद्रावर धाड टाकून 5 गुन्हे नोंदवले.सदर ठिकाणी आरोपी मिळून आले नाहीत.महाराष्ट्र दारू बंदी कायदा 1949 अंतर्गत बेवारस 5 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.टाकलेल्या धाडीत बुट्टेनाथ दरी येथे बेवारस स्थितीत 11 हजार 535 लिटर रसायन,45 लिटर तयार हातभट्टी दारू,57 बॅरल (200 लिटर),70 किलो ग्रॅम गुळ,9 डब्बे,2 टोपली असा एकूण 2 लाख 59 हजार 650/- रूपये (दोन लाख एकोणसाठ हजार सहाशे पन्नास रुपये) किंमतीचा मुद्देमाल जप्त करून त्यातील काही जागेवरच नष्ट करण्यात आला.सदरच्या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क, अंबाजोगाई विभागाचे प्रभारी निरीक्षक अनिल गायकवाड,जवान बि. के.पाटील,वाहन चालक के.एन.डुकरे यांनी सहभाग घेतला.


Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *