बीड: शेतकर्‍यांना पिक विम्यासाठी लागणारी कागदपत्रे गावातच उपलब्ध ; अंबाजोगाईतील ममदापुर परळी ग्रामपंचायतचा पुढाकार

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―एकीकडे दुष्काळी परिस्थिती असल्याने तसेच शेतकरी शेतीच्या कामात गुंतल्याने तालुक्याला येणे हा खर्च परवडणारा नाही.हे लक्षात घेवून तालुक्यातील ममदापुर परळी ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयाच्या वतीने शेतकर्‍यांना पीक विमा भरण्यासाठी आवश्यक आसणारी सातबारा व आठ ‘अ’ ही कागदपत्रे गावातच उपलब्ध करून दिली. या सोबतच 60 कुटुंबांना शिधापत्रिकेचे वाटप (रेशनकार्ड) करण्यात आले.

अंबाजोगाई तालुक्यात ममदापुर परळी हे डोंगर पट्यात असणारे गांव. गावची लोकसंख्या 794 एवढी.गावात जिल्हा परीषदेची पहीली ते पाचवी पर्यंतची शाळा आहे. निसर्गाची विपुलता असली तरी सततचा दुष्काळ व नापिकीमुळे शेतकरी ञस्त आहे.तरी 2 वर्षांपासून पाणी फाऊंडेशनच्या ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ माध्यमातून गाव पाणीदार करण्यासाठी ग्रामस्थ श्रमदान करीत आहेत.शेतकर्‍यांना दुष्काळी परिस्थितीमुळे तसेच शेतातील पेरणी, कोळपणीची कामे असल्याने त्यांचा अनावश्यक खर्च व मानसिक ताण टाळण्यासाठी ममदापुर परळी (ता.अंबाजोगाई) ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयाच्या वतीने गावातच पीक विमा भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे तसेच शिधापत्रिका यांचे वाटप करून दिलासा देण्याचे काम करण्यात आले. यासाठी सरपंच निर्गुणा विठ्ठल सुरवसे व सरपंचपुत्र मनोहर सुरवसे,तलाठी विनोद थडकर यांनी पुढाकार घेतला.त्यांना तहसीलदार संतोष रूईकर,नायब तहसीलदार (पुरवठा) जी.एल.साळुंके,पुरवठा विभागातील प्रकाश गोपट यांचे मोलाचे सहकार्य लाभले.या उपक्रमामुळे ममदापुर परळी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत व तलाठी कार्यालय यांच्या तत्पर सेवेबद्दल समाधान व्यक्त केले.

ग्रामस्थांना शासकीय योजनांचा लाभ-तलाठी विनोद थडकर

ममदापुर परळी गावातील गांवकरी व शेतकर्‍यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतक-यांची हेळसांड होवू नये म्हणून गावातच शेतकर्‍यांना पिकविमा भरण्यासाठी सातबारा व आठ ‘अ’ ही कागदपत्रे तसेच शिधापत्रिकांचे वाटप करण्यात येत आहे. पुढील काळात जेवढ्या योजना असतील त्या राबविण्यात येतील.

पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून गाव पाणीदार करणार- मनोहर सुरवसे

सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेत सहभागी होवून ग्रामस्थांनी लोकसभागातून गावात जलसिंचन व संवर्धनाची अनेक कामे केली. गतवर्षी तृतीय क्रमांक पटकावला.यावर्षी स्पर्धेत प्रथम येण्याचा आशावाद ममदापुर परळी ग्रामस्थांनी बाळगला आहे.गावात 25/15 अंतर्गत रस्ते, स्मशानभुमीची कामे झाली असून पंतप्रधान किसान सन्मान योजनेतून शेतकर्‍यांना वार्षिक मानधन मिळवून दिले. जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याचा हौद तसेच नागरिकांना बसण्यासाठी गावात सिमेंटचे बाकडे यांची व्यवस्था ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.