बीड जिल्हाब्रेकिंग न्युजविशेष बातमी

एकही पुष्पहार, बुके न घेता धनंजय मुंडेंचा वाढदिवस साधेपणाने साजरा ; बेरोजगारांना जॉब कार्ड वाटप

परळी:आठवडा विशेष टीम― दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज आपल्या एकाही समर्थक, हितचिंतकाकडून एकही पुष्पहार, बुके न घेता केवळ शुभेच्छांचा स्वीकार करत साधेपणाने वाढदिवस साजरा केला. शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या हजारो हितचिंतकांनी गरीब मुलांसाठी वह्या, पेन देण्याचा अनोखा उपक्रम राबवित वेगळ्या पध्दतीने वाढदिवस साजरा केला.

ना.धनंजय मुंडे यांनी आज आपल्या 44 व्या वाढदिवसाच्या दिवशी सकाळी परळीत आपल्या मातोश्री श्रीमती रूक्मीणबाई मुंडे यांचे आशिर्वाद आणि कुटुंबियांच्या शुभेच्छा सर्वप्रथम स्वीकारल्या. प्रभु वैद्यनाथाचे दर्शन घेतल्यानंतर जगमित्र कार्यालयात शुभेच्छा देण्यासाठी जमलेल्या हजारो कार्यकर्त्यांकडून त्यांनी शुभेच्छा स्वीकारल्या. दुष्काळी पार्श्वभूमीवर कोणतेही उत्सवी कार्यक्रम आयोजित न करता साधेपणाने वाढदिवस करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले होते.

त्याला कार्यकर्त्यांनी प्रतिसाद देत पुष्पहार किंवा बुके न आणता शालेय उपयोगी वह्या, पेन, पुस्तके असे शैक्षणिक साहित्य श्री.मुंडे यांना भेट दिले, हे सर्व जमा झालेले साहित्य गरीब मुलांना वाटप करण्यात येणार आहे. तब्बल 3 तास त्यांना शुभेच्छा देण्यासाठी हजारो नागरिकांनी गर्दी केली होती. यात सर्व स्तरातील नागरिकांचा समावेश होता. दिवसभरही शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांमुळे संपुर्ण जगमित्र कार्यालयाचा परिसर गजबजुन गेला होता. राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेससह सर्व पक्षाच्या प्रमुख नेते मंडळींनी दुरध्वनीद्वारे धनंजय मुंडे यांचे अभिष्टचिंतन केले.

स्वीकारली शैक्षणिक खर्चाची जबाबदारी

वाढदिवसाचे औचित्य साधत परळीतील कै.नागेश फुलारी यांची कन्या कु.केतकी हिच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी नाथ प्रतिष्ठानने स्वीकारत तिच्या नावे 50 हजार रूपयांची डिपॉजिटची पावती केतकी व कुटुंबियांना सुपूर्त केली. यावेळी सर्व मित्रमंडळी व फुलारी मित्र मंडळाचे सदस्य उपस्थित होते. कै.नागेश फुलारी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक म्हणुन ओळखले जात होते. काही दिवसांपूर्वी त्यांचे दुःखद निधन झाले होते.

जॉब कार्डचे वाटप

या वाढदिवसानिमित्त परळी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दि.28 जुलै रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, याचाच भाग म्हणुन बेरोजगारांना जॉब कार्ड वाटप करण्याचा कार्यक्रमही आज ना.मुंडे यांच्या हस्ते संपन्न झाला. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहरात भव्य रक्तदान शिबीर, 1 लाख वह्यांचे वाटप आदी कार्यक्रम आज घेण्यात आले. याशिवाय आगामी 7 दिवसात आधार महोत्सवाच्या नावे दररोज विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.

बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.