ब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्यराजकारण

मंत्री, आमदारांप्रमाणेच सरपंचही घेणार आता पद आणि गोपनियतेची शपथ!―ग्रामविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी दिली प्रस्तावास मान्यता

मुंबई दि.१६:आठवडा विशेष टीम― मंत्री,आमदारांप्रमाणेच थेट जनतेतून निवडून आलेला सरपंचही आता पद आणि गोपनियतेची शपथ घेणार आहे, राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी नुकतीच या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.

थेट जनतेतून निवडून आलेला सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांची ग्रामपंचायत बाबत असलेली बांधिलकी आणि गावाच्या विकासाच्या दृष्टीने असलेली जबाबदारी याबाबत गावातील जनतेमध्ये तसेच लोकप्रतिनिधी मध्ये जागरूकता निर्माण करणे हा या शपथ घेण्यामागचा उद्देश असल्याचे ना. पंकजाताई मुंडे यांनी सांगितले. राज्य निवडणूक आयोगाशी चर्चा केल्यानंतर ग्रामविकास विभागाने यासंदर्भात जो प्रस्ताव सादर केला होता, त्यास मान्यता देण्यात आल्याचे त्या म्हणाल्या.

असा आहे प्रस्ताव

सरपंच व सदस्यांना शपथ देण्यासंदर्भात परिपत्रक निर्गमित करण्याच्या सूचना प्रधान सचिव ग्रामविकास यांनी नुकत्याच दिल्या आहेत. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम ३३(२) अन्वये जिल्हाधिकारी यांनी नियुक्त केलेला अधिकारी पहिल्या सभेचे अध्यक्षस्थान स्विकारेल, पहिल्या सभेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी अध्यासी अधिकारी थेट जनतेतून निवडून आलेला सरपंच यांना शपथ देईल आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम व महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच व उप सरपंच) निवडणूक नियम, १९६४ चा अवलंब करून कार्यवाही सुरू करेल. अध्यासी अधिका-यांनी गण संख्येसंबंधी कार्यवाही पूर्ण केल्यानंतर सरपंच हा पहिल्या सभेचा अध्यासी अधिकारी म्हणून काम पाहील. अध्यासी अधिकारी म्हणून सरपंच ग्रामपंचायती मधील नवनियुक्त इतर सदस्यांना सामुदायिक शपथ देईल व त्यानंतर उप सरपंचाची निवडणूक पार पाडली जाणार आहे, असे प्रस्तावात नमुद करण्यात आला आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणूकीनंतर हा प्रस्ताव लागू होणार आहे.

ना. पंकजाताईंनी वाढवला सरपंचांचा मान

ग्रामविकास मंत्री म्हणून काम करत असताना ना. पंकजाताई मुंडे यांनी ग्रामीण भागाच्या मुलभूत विकासाबरोबरच सरपंच व सदस्यांचा सन्मान वाढविण्याचे काम केले. थेट जनतेतून निवड असो, वित्त आयोगाचा निधी असो की त्यांच्या मानधन वाढीचा प्रश्न असो ना. पंकजाताई मुंडे यांनी हे प्रश्न मार्गी लावून सरपंचाला जादा अधिकार दिले, त्यामुळे सरपंच मोकळ्या वातावरणात काम करू लागले आहेत, आता मंत्री, आमदारांप्रमाणे पद आणि गोपनियतेची शपथ घेण्याचा प्रस्ताव त्यांना लागू करून राज्यातील तमाम सरपंचांचा सन्मान वाढविण्याचे काम त्यांनी केले आहे.

जि. प. अध्यक्षांनाही शपथ देण्याचा विचार

सरपंचाप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद अध्यक्ष आणि सदस्य तसेच पंचायत समितीच्या सभापती आणि सदस्य यांना देखील शपथ देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे पंकजाताई मुंडे यांनी बोलताना सांगितले.


बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.