परभणी: पालम च्या दंगलग्रस्त भागास धनंजय मुंडे यांची भेट ; चौकशीची मागणी,जनतेला केले शांततेचे आवाहन

गंगाखेड:आठवडा विशेष टीम―परभणी जिल्ह्यातील पालम येथे काल बुधवारी दोन गटात झालेल्या दंगलीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पाहणी केली. जनतेला शांततेचे आवाहन करतानाच या घटनेस जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. मात्र ते करतानाच निरपराधी लोकांवर कोणतीही कारवाई होणार नाही याची पोलिसांनी दखल घ्यावी अशी सूचनाही मुंडे यांनी केली.

पालम येथे दिनांक 17 जुलै च्या सायंकाळी शहरातील दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. या हाणामारीचे पर्यावसन दंगलीत होऊन मोठ्या प्रमाणावर जाळपोळ झाली.

आज मुंबईवरून नांदेड मार्गे परळीकडे येत असताना धनंजय मुंडे यांनी पालम शहरास भेट दिली. नुकसान झालेल्या भागाची त्यांनी स्थानिक आमदार डॉ. मधुसुदन केंद्रे आणि यांच्यासह पाहणी केली. त्यानंतर पोलिस अधिकारी, महसुल अधिकारी यांच्याशीही चर्चा करून शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या.

गंगाखेड येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी या माध्यमातून जनतेला शांततेचे आवाहन केले.
या घटनेची उच्चस्तरीय चौकशी
करण्याची मागणी केली.या घटनेत ज्या निरपराध लोकांच्या मालमत्तांचे नुकसान झाले आहे त्याची नुकसान भरपाई शासनाने द्यावी अशी मागणीही त्यांनी केली. या घटनेतील दोषींवर कारवाई झाली पाहिजे मात्र ते करताना विनाकारण सामान्य लोकांवर कारवाई होणार नाही याचीही पोलिसांनी काळजी घ्यावी असे आवाहन केले. यावेळी डॉक्टर मधुसूदन केंद्रे, युवक नेते मिथिलेश केंद्रे यांच्यासह स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.