प्रशासकीयब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्य

कोरोना नियंत्रणासाठी यंत्रणा एकाच सेंट्रल कमांडखाली काम करणार

मुंबई, दि. २८ :- पुणे शहर व जिल्ह्यातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी यापुढच्या काळात संपूर्ण यंत्रणा एकाच सेंट्रल कमांडच्या निर्देशानुसार काम करेल. कटेंन्मेंट भागात घरोघरी जावून मर्यादित कालावधीत तपासणी पूर्ण केली जाईल. रुग्णांचा शोध घेऊन त्याचं सुरक्षित अलगीकरण, विलगीकरण केलं जाईल. कोरोना प्रसार रोखण्यासाठी जनजागृती करुन लोकसहभाग वाढवण्यात येईल. विभागीय आयुक्तांसह जिल्ह्याधिकारी, महापालिका आयुक्तांसह प्रमुख अधिकारी नियमित पत्रकार परिषद घेऊन नागरिकांशी संवाद साधतील. नागरिकांना, लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन कोरोनाविरुद्धची लढाई एकजुटीनं लढली जाईल आणि आम्ही पुणेकर कोरोनाविरुद्धची ही लढाई नक्की जिंकू, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित विशेष बैठकीत व्यक्त केला.

पुणे शहर, जिल्ह्यातील कोरोनाची सद्यस्थिती, उपाययोजनांसंदर्भात उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात आज संध्याकाळी एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठकीत सहभागी झाले होते. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, राज्याचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, विभागीय आयुक्त कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी सौरभ राव, पुणे मनपाचे आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवडचे आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जमाबंदी आयुक्त तथा ‘ससून हॉस्पिटल’चे समन्वयक एस. चोक्कलिंगम यांच्यासह वरिष्ठ अधिकारी हे देखील प्रत्यक्ष किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीला उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी म्हणाले की, पुण्यात ‘कोरोना’च्या चाचण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आल्यामुळेच रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसत आहे. पुण्यातील स्थिती नियंत्रणात आहे. पुण्यातील कोरोनाचा प्रसार रोखण्याचा मुद्दा राज्य शासनाने गांभीर्याने घेतला असून जिल्ह्यातील सर्व यंत्रणां युद्धपातळीवर कामाला लागल्या आहेत. खुद्द मुख्यमंत्री दोन दिवसात पुण्याला भेट देणार असून त्यांच्या भेटीमुळे या लढाईला निश्चित बळ मिळेल. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी पुणे जिल्ह्यातील कोरोनाच्या स्थिती आणि उपाययोजनांसंदर्भात माहिती सादर केली.

पुणे जिल्ह्यात तीन जम्बो कोविड रुग्णालये उभारण्यात येत आहेत. ससुन रुग्णालयासह सर्वच रुग्णालयातील बेडची संख्या वाढवण्यात येत आहे. व्हेन्टीलेटर्स, आयसीयु आणि ऑक्सिजन बेडची संख्या वाढवण्यावर भर असल्याचे यावेळी सांगण्यात आले. गरजू रुग्णांना हे बेड उपलब्ध होण्यासाठी स्वतंत्र व्यवस्थापन यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे. खाजगी रुग्णालयांचंही सहकार्य मिळत आहे. खाजगी रुग्णालयांना त्यांच्या गरजेनुसार तज्ज्ञ डॉक्टर, भूलतज्ज्ञ, फिजिशियन, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई सेवा देणारे कर्मचारी आदी उपलब्ध होतील, याचेही प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button