ब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्यरोजगारविशेष बातमी

नियुक्ती रद्द झालेल्या ८३२ सहाय्यक RTO विद्यार्थ्यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा ; धनंजय मुंडेंच्या पाठपुराव्याला यश

विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी कायम झटणार - धनंजय मुंडे

मुंबई दि.२०:आठवडा विशेष टीम― सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकपदाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नियुक्ती रद्द झालेल्या ८३२ विद्यार्थ्यांना सर्वोच्च न्यायालयाने न्याय दिला आहे. या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी विधान परिषद विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी सातत्याने सभागृहात व सभागृहाबाहेर पाठपुरावा केला होता, त्यामुळे आता त्यांना नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

गेल्या एक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित होता. विरोधी पक्षनेते मुंडे सतत या प्रकरणाचा पाठपुरावा करत होते. विद्यार्थ्यांनी आझाद मैदानात आंदोलन छेडले तेव्हाही मुंडे यांनी विद्यार्थ्यांची भेट घेतली होती तसेच विधान परिषदेत लक्षवेधी उपस्थित करून हा प्रश्न सभागृहात मांडला होता. लोकमत समूहाच्या रायझिंग महाराष्ट्र या कार्यक्रमातही दिवाकर रावते चर्चेला बसले असता या ८३२ विद्यार्थ्यांना भवितव्याबाबत मुंडे यांनी मंत्री दिवाकर रावते यांना धारेवर धरले होते. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची भेट घेऊन या प्रकरणात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात योग्य भूमिका मांडून या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा असा आग्रह धरला होता.

आज दिड वर्षींनी विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी लागल्याने धनंजय मुंडे यांनी हा विरोधी पक्षाचा मोठा विजय असल्याचे म्हटले आहे.

उच्च न्यायालयाने या नियुक्त्यांना स्थगिती दिली होती . मात्र सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त्या योग्य असल्याचा निर्णय दिला आहे. धनंजय मुंडे यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी कायम झटणार असे आश्वासनही दिले आहे.

धनंजय मुंडे म्हणाले की, या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला त्याचे फळ मिळाले आहे. सर्वोच्च न्यायालयाने विद्यार्थ्यांना दिलासा दिला याचे समाधान वाटत आहे असे ते म्हणाले.

दरम्यान हा प्रश्न सातत्याने लावून धरल्याबद्दल या 832 उमेदवारांनी धनंजय मुंडे यांचे सोशल मिडियाद्वारे आभार व्यक्त केले आहेत.

बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.