बीड: पाटोदाच्या तहसीलदार रूपा चित्रक निलंबित ; केंद्रेकरांनी काढले आदेश

पाटोदा:आठवडा विशेष टीम― बीड जिल्ह्यातील पाटोदा तहसील कार्यालयाच्या तहसीलदार रूपा चित्रक यांच्या निलंबनाचा प्रस्ताव बीड जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडे पाठविला होता. त्यावर चित्रक यांना निलंबित करण्याचे आदेश सुनील केंद्रेकरांनी दिले आहेत. तहसीलदार रूपा चित्रक दुसऱ्यांदा निलंबित झाल्या आहेत. यापूर्वी जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे कार्यरत असताना त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती अशी माहिती आहे.

रूपा चित्रक यांनी पाटोदा तहसीलदारपदाचा पदभार स्वीकारल्यापासून त्यांचे अनेक निर्णय वादात सापडले होते. चारा छावणी सुरु असताना शासकीय दस्ताऐवजांवर मागील तारखेत स्वाक्षरी करणे, कार्यालयात हजर न राहणे, वरिष्ठांच्या नोटिशीला उत्तर न देणे, कर्मचाऱ्यांना अरेरावीची भाषा वापरणे, पदाचा गैरवापर करुन तलाठ्यांच्या बदल्या करणे, शासकीय वाहनावर खासगी चालक ठेवणे, शासकीय योजनांच्या बांधकामासाठी आवश्यक असणाऱ्या वाळू बाबत जिल्हाधिकारी बीड व जालना यांचे आधिकार वापरुन बेकायदेशीर परवानगी देणे, यासह विविध कारणांमुळे त्यांच्या निलबंनाचा व विभागीय चौकशीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्याकडे पाठवला होता. रूपा चित्रक यांना त्यांचे खुलासा मांडण्याची परवानगी दिली होती. मात्र, त्यांनी दिलेला खुलासा समाधानकारक नसल्याचे या आदेशात नमुद केले गेले आहे.

दरम्यान पाटोदा तहसील कार्यालयातील तीन कर्मचाऱ्यांवर कारवाई करीत गुन्हे दाखल केले होते, ही कारवाई योग्य नसल्याची भूमिका घेत जिल्हाभरात महसूल कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले होते. त्यानूसार जिल्हाधिकाऱ्यांनी एक समितीची स्थापनाकरुन चौकशी केली होती. त्यानूसार सर्व अहवाल विभागीय कार्यालयात पाठवून निलंबन तसेच विभागीय चौकशी करण्याची विनंती केली होती.त्यामुळे रुपा चित्रक यांना दोषी धरत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून त्यांची विभागीय चौकशी होणार आहे.अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.