बीड: ३०० रुपयांच्या हिशोबासाठी विटांनी ठेचून पत्नीचा खून

बीड:आठवडा विशेष टीम― येथून जवळच असलेल्या सातेफळ शिवारातील एका वीट भट्टीवर काम करणाऱ्या मजूर दांपत्यात मंगळवारी रात्री तीनशे रुपयांच्या खर्चाचा हिशोब देण्यावरून वाद झाला. त्यानंतर चिडलेल्या पतीने पाच महिन्यांच्या चिमुरड्या लेकीसमोरच पत्नीला विटांनी ठेचून काढले. या मारहाणीत पत्नीचा जागीच मृत्यू झाला. बुधवार पहाटे खुनाची ही घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर परराज्यात पलायनाच्या तयारीत असलेल्या पतीला पोलिसांनी अवघ्या चार तासात उस्मानाबाद जिल्ह्यातून बेड्या ठोकल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दिपाली आश्रुबा नरसिंगे (वय २२) असे त्या मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी दिपालीची आई भारती भागवत उपाडे (रा. गिरवली, ता. अंबाजोगाई) यांनी फिर्यादीत नमूद केल्यानुसार दिपालीचा विवाह मागील वर्षी आश्रुबा उर्फ अशोक गुलाब नरसिंगे (रा. रायगव्हाण, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) याच्यासोबत झाला होता. लग्नानंतर एक महिन्यातच आश्रुबा आणि त्याच्या कुटुंबीयांनी दिपालीला मारहाण करून हाकलून दिले होते. त्यानंतर तिच्या माहेरच्या आणि सासरच्या लोकांनी आपसात नोटरी करून प्रकरण मिटविले आणि दिपालीला पुन्हा सासरी पाठविण्यात आले. त्यानंतर पाच महिन्यापूर्वी दिपालीला मुलगी झाली. दोन महिन्यापूर्वी दिपाली आणि आश्रुबा भारतीबाई यांच्याकडे आले आणि आम्हाला घरी राहू देत नाहीत, तुम्हीच इकडे एखाद्या वीटभट्टीवर आम्हाला कामाला लावून द्या अशी विनवणी केली. त्यांनतर भारतीबाई यांनी सातेफळ येथील एम.डी. वीटभट्टीवर ६० हजार उचालीच्या बदल्यात दोघांनाही कामाला लावले. त्यावेळेस पासून दोघेही वीटभट्टीवरच विटा रचलेल्या दोन खोल्यांच्या घरात राहत होते. दरम्यान, पंधरा दिवसापूर्वी आश्रुबाने दिपालीला बाजार करण्यासाठी तीनशे रुपये दिले होते. त्याचा हिशोब देण्यावरून त्याने दिपालीला बेदम मारहाण केली. त्यामुळे ती माहेरी निघून आली. चार दिवस तिथे राहिल्यानंतर मागील मंगळवारी तिला पुन्हा सातेफळ येथे नेऊन सोडण्यात आले. कालच्या मंगळवारी दुपारी १ वाजता दिपालीचे वडील आणि भाऊ तिच्या साठी कपडे आणि इतर साहित्य घेऊन तिच्याकडे गेले होते आणि सायंकाळी निघून आले. त्यानंतर रात्रीच्या सुमारास आश्रुबा आणि दिपालीमध्ये पुन्हा तीनशे रुपयांच्या हिशोबावरून वाद झाला. यावेळी संतापलेल्या आश्रुबाने दिपालीला विटांच्या साह्याने अक्षरशः ठेचून काढले. यावेळी त्याची पाच महिन्यांची चिमुरडी नंदिनी ही देखील समोरच बांधलेल्या झोळीत होती. दिपाली रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडल्यानंतर आश्रुबाने नंदिनीला एकटेच घरात सोडून पळ काढला. त्यानंतर बुधवारी पहाटे पाच वाजता त्याने दिपालीचे चुलते भारत दादाराव उपाडे यांना फोन केला आणि तुमच्या मुलीला मी विटांनी मारले आहे, मेली का जिती आहे ते जाऊन बघा आणि तिच्या आई-वडिलांना सांगा अशी उर्मट भाषा वापरत फोन बंद केला. त्यानंतर दिपालीच्या माहेरच्या लोकांनी रिक्षातून सातेफळ गाठले. तोपर्यंत दिपालीचा मृत्यू झालेला होता. याप्रकरणी भारतीबाई यांच्या फिर्यादीवरून आश्रुबा नरसिंगे याच्यावर अंबाजोगाई ग्रामीण पोलिसात पत्नीच्या खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास भिकाने हे करत आहेत.

पाच महिन्यांची चिमुरडी रात्रभर आईच्या मृतदेहाशेजारी―

वीटभट्टीवरील विटा रचलेल्या दोन खोल्यांच्या घरात आश्रुबाने दिपालीला संपविले. यावेळी त्याची पाच महिन्यांची मुलगी नंदिनी जवळच असलेल्या झोळीत झोपलेली होती. ती रात्रीतून कधीतरी उठली असेल तेंव्हा तिची आई या जगात राहिली नव्हती आणि क्रूरकर्मा बापाने पळ काढला होता. भुकेने व्याकूळ झालेली नंदिनी रात्रभर आईच्या मृतदेहापासून जवळच झोळीत सतत रडत होती. पहाटे आजी भारतबाई आल्यानंतर त्यांनी नंदिनीला उचलून घेतले. बापाच्या रागापायी ती चिमुरडी क्षणात आई-वडिलांच्या प्रेमाला पारखी झाली.

पत्नीला यमसदनी धाडून घेत होता चहाचे झुरके―

खुनाच्या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत डिसले, पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांचे एक पथक पंचनामा करण्याकामी तर दुसरे पथक आरोपीच्या शोधासाठी कार्यरत झाले. आश्रुबाच्या मोबाईल नंबरचे लोकेशन शोधण्यात आले असता तो उस्मानाबाद जिल्ह्यातील मुरुड परिसरात दिसून आला. ग्रामीण पोलीस ठाण्यातील कर्मचारी हरिदास नागरगोजे आणि रशीद पठाण यांच्या नजरेस पडला तेंव्हा तो मुरुडमधील एका हॉटेलमध्ये चहाचे झुरके घेत बसला होता. पोलिसांनी त्यास ताबडतोब बेड्या ठोकून अंबाजोगाईला आणले.

हैद्राबादला पलायनाचा डाव फसला―

पत्नीचा खून केल्यानंतर आश्रुबाने घरातून पळ काढला आणि आठ किमी अंतर पायी चालत तो पाटोद्याला गेला. तिथून सकाळी बसने तो मुरुडला गेला. तिथून तो हैदराबादला पलायन करणार होता. परंतु, त्यापूर्वीच तो पोलिसांच्या तावडीत सापडला. पंचनाम्याची कार्यवाही पूर्ण होण्यापूर्वीच पोलिसांनी त्याला जेरबंद केले होते.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.