मुंबई:आठवडा विशेष टीम― गुणवत्ता असूनही बिकट आर्थिक स्थितीमुळे एमबीबीएस प्रवेश अनिश्चित झालेल्या कळंब (जि. उस्मानाबाद) तालुक्यातील शेतमजुराच्या मुलाच्या प्रवेशासाठी राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे धाऊन गेल्या आहेत, गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने गोरख मुंडे यांस एक लाख ५१ हजाराची मदत देण्याचे त्यांनी जाहीर केल्यामुळे गोरखच्या एमबीबीएस चा मार्ग सुकर होण्यास मदत होणार आहे.
भोगजी ता.कळंब जि.उस्मानाबाद येथील गोरख मुंडे या आईविना पोरक्या असलेल्या शेतमजुराच्या होतकरू मुलाला बिकट आर्थिक परिस्थितीमुळे ‘एमबीबीएस’ च्या प्रवेशासाठी प्रचंड फीस भरण्यासाठी अडचण येत होती.मेडीकल प्रवेश पात्रतेसाठी घेण्यात आलेल्या देश पातळीवरील नीट परीक्षा गोरखने दिली.जूनमध्ये याचा निकाल लागला.यात गोरखने ५०५ गूण मिळवून देशपातळीवर ४६३४२ तर राज्यस्तरावर ३८८८ हा रँक मिळविली. ज्या महाविद्यालयात प्रवेश मिळणार आहे तेथील ४ लाख ६६ हजार रूपये एवढे शैक्षणिक शुल्क व इतर खर्चाची रक्कम आगामी पाच दिवसात भरावी लागणार होती. तरच प्रवेश निश्चित होणार आहे.या स्थितीत गोरख व त्याचे वडील तुकाराम यांच्याकडे एक छदामही शिल्लकीत नाही.ना तशी त्यांची ऐपत आहे.यामुळे कठीण स्थितीत यशाच्या पल्ला गाठलेल्या गोरखच्या मार्गात पुन्हा परिस्थितीच्या ‘स्पीड ब्रेकर’ने मोठा अडथळा आणल्यामुळे होतकरू विद्यार्थ्याचा ‘एमबीबीएस’ प्रवेश ‘अनिश्चित’ बनला होता.
याच पार्श्वभूमीवर,ही गोष्ट राज्याचा ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या निदर्शनास आली त्यांनी याची तात्काळ दखल घेत या विद्यार्थ्यांला गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक लाख ५१ हजार रुपयांची भरीव आर्थिक मदत करणार असल्याची फेसबुक पोस्ट करून संबंधित विद्यार्थ्यांने आपल्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले. या मदतीमुळे गोरखचे डाॅक्टर होण्याचे स्वप्न आता साकार होणार आहे.