जालन्याच्या प्रचंड जाहीर सभेत विरोधकांवर साधला निशाणा
जालना दि. २८: गेल्या सत्तर वर्षात देशातील जनतेला गरीबीच्या अंधारात ढकलणा-या काॅग्रेसला एकही योजना राबविता आली नाही, उलटपक्षी एवढी वर्षे सत्तेत असूनही त्यांना जो विकास जमला नाही तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पांच वर्षात करून दाखवला. त्यामुळे विकासाच्या बळावर पुन्हा एकदा मोदी सरकारच सत्तेच्या सिंहासनावर विराजमान होईल असा ठाम विश्वास राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी आज येथे व्यक्त केला.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने शहरातील मामा चौकात आयोजित करण्यात आलेल्या प्रचंड जाहीर सभेत त्या बोलत होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज संध्याकाळी ही सभा मोठ्या उत्साहात पार पडली. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महसुल व बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, युवा मोर्चा चे प्रदेशाध्यक्ष आ. योगेश टिळेकर आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी ना पंकजाताई मुंडे यांनी आपल्या भाषणात केंद्र व राज्य सरकारने सर्व सामान्य जनतेसाठी केलेल्या विकास कामांची माहिती देतानाच काॅग्रेस व राष्ट्रवादीच्या भ्रष्ट कारभारावर जोरदार टीका केली. यंदा निसर्गाने साथ दिली नसल्याने पाऊस पडला नाही पण कोट्यवधी रुपयांचा निधी देवून सरकारने निधीचा पाऊस पाडला. हे सरकार शेतक-यांचा व सर्व सामान्य माणसाचा विचार करणारे आहे, कर्जमाफी करून वेगवेगळ्या अनुदानाच्या रूपाने शेतक-यांना आधार देण्याचे मोदी सरकारने केले. बेरोजगार तरूणांना उद्योग व्यवसाय उभारणीसाठी मुद्रा योजना, कौशल्य विकास योजना राबविल्या. उज्ज्वला गॅस, स्वच्छता अभियान, प्रत्येकाला घरकुल, घरोघरी वीज देणारी सौभाग्य योजना, बेटी बचाव बेटी पढाव, शौचालय, जनधन आदी योजनांबरोबरच राष्ट्रीय महामार्ग व दळणवळणाच्या अनेक योजना यशस्वीपणे राबवल्या. मोदींनी गरीबांना समोर ठेवून काम केले. गेल्या सत्तर वर्षात काॅग्रेसने जेवढा विकास केला नाही तेवढा केंद्र व राज्य सरकारने पाच वर्षात करून दाखवला. नोटाबंदीमुळं खरं नुकसान गरीबांचे नाही तर काळा पैसा असणारांचे झाले आहे असे सांगून मोदींना सत्तेवरून बाजूला करण्यासाठी सर्व मजबूर नेते एकत्र आले आहेत. त्यांचा हा डाव वेळीच ओळखून विकासाचा ध्यास घेतलेल्या मोदींना पुन्हा एकदा सत्तेवर आणा असे आवाहन त्यांनी केले. सभेला प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.