मुंबई : २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ईव्हीएम हॅक केल्याचा दावा आंतरराष्ट्रीय हॅकरने केला होता. विशेष म्हणजे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांना ईव्हीएम हॅकिंगबद्दल सर्व माहिती असल्यामुळे पक्षातील नेत्यांनीच त्यांची हत्या केल्याचा आरोप हॅकरने केला होता. या प्रकरणाविषयी गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या मंत्री पंकजा मुंडे यांनी अखेर मौन सोडले आहे.
या विषयाचं राजकीय भांडवल करणारी मी राजकारणी नाही, मी हॅकर नाही, तपास यंत्रणा नाही, मी एक कन्या आहे, अशा शब्दात मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.अशा गोष्टींमुळे कुटुंबीयांना मानसिक त्रासातून जावं लागत आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर मी स्वतः गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे CBI चौकशीची मागणी केली होती. ती चौकशी पूर्ण झाली आहे. देशातली मोठं मोठी लोकं याची दखल घेतील, असेही पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. EVM हॅक होऊ शकत नाहीत हे सिद्ध झालं आहे, असेही मुंडे यावेळी म्हणाल्या.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ईव्हीएम हॅक केल्याचा दावा आंतरराष्ट्रीय हॅकर सय्यद शुजाने केला आहे. विशेष म्हणजे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांना ईव्हीएम हॅकिंगबद्दल सर्व माहिती असल्यामुळे पक्षातील नेत्यांनीच त्यांची हत्या केल्याचा अत्यंत खळबळजनक आरोप या हॅकरने केला. २०१४ मधील लोकसभा निवडणुकांच्या वेळी गोपीनाथ मुंडेंनी आपल्याशी संपर्क साधला होता, असा दावा सय्यद शुजाने केला. गोपीनाथ मुंडे यांना ईव्हीएम हॅक केल्याची माहिती होती. मुंडे ही बाब जगजाहीर करण्याच्या भीतीनेच भाजपमधील काही नेत्यांनी त्यांची हत्या घडवून आणली, असा दावा सय्यद शुजाने यावेळी केला.
गोपीनाथ मुंडे यांचं राजधानी दिल्लीत कार अपघातामध्ये निधन झालं होतं. ३ जून २०१४ रोजी दिल्ली विमानतळावर जाताना त्यांच्या गाडीला एका वेगवान कारने धडक दिली होती. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मुंडेंना तातडीने ‘एम्स’मध्ये दाखल करण्यात आलं, मात्र कार्डिअॅक अरेस्टमुळे त्यांची प्राणज्योत मावळली.